आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 हजारांपेक्षा कमी गुण मिळल्यास जालना पालिका होणार बरखास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना  - देशभरातील ५०० शहरांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान-२०१७’ हा उपक्रम राबवण्यात येत असून यात जालन्याचाही समावेश आहे. स्वच्छतेविषयी मूल्यांकन होत असून, घनकचरा, कचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया आदी विभागातील स्वच्छतेवरून श्रेणी दिली जाते.
 
दरम्यान, शहरातील ३० प्रभागांतील ६१ वॉर्ड, अडीच लाख लोकसंख्या, रोज निघणारा ६५ टन कचरा, रखडलेला घनकचरा प्रकल्प, अस्वच्छता आदी कारणांमुळे जालना नगरपालिकेवर बरखास्तीची वेळ येते की काय, असा प्रश्न जालनेकरांकडून उपस्थित होत आहे.  
 
जिल्ह्यातील ७९० खेड्यांशी जोडलेला असल्यामुळे जालना शहरात चारही प्रमुख मार्गावरून सकाळपासूनच वाहन, पादचाऱ्यांची वर्दळ असते.  शहराच्या औरंगाबाद, देऊळगावराजा, मंठा, अंबड या चारही बाजूंनी शहराचा विस्तार वाढत आहे.
 
शहरातील कपडा बाजार, मामा चौक, महावीर चौक, भाजीमंडई, सराफा बाजार, शिवाजी पुतळा, मंमादेवी चौक, बसस्थानक मार्ग, जुना मोंढा या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. 
 
 शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळ खात पडून आहे.  कुटुंब संख्येच्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी कमी असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे.
 
शहर स्वच्छ करण्यासाठी अनेक संघटनांनी निवेदने देऊन पालिकेतील स्वच्छता विभागाला धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या ब्रीदवाक्याखाली राज्यात स्वच्छतेवर भर दिला आहे.
 
 प्रत्येक  पालिकांना शहरातील स्वच्छतेचे टार्गेट दिले आहे. यानुसार प्रत्येक पालिका, गावपातळीवर स्वच्छता केली जात आहे. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय कार्यालय, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद या विभागाच्या प्रमुखांनाही सोबत घेऊन स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते.  परंतु, घनकचरा प्रकल्प अपूर्ण असून कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरातील चार ते पाच गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील एकंदरीत स्वच्छताविषयी प्रगती पाहता कमी गुण मिळू शकतात. 
 
परंतु, पालिका अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी,  राजकीय पदाधिकारी, नागरिक यांनी एकत्रित येत स्वच्छतेवर तोडगा काढल्यास नगरपालिका बरखास्त होण्याची नामुष्की येणार नाही.  येत्या सोमवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून, यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उपसंचालक स्मिता झगडे यांचे पथक पहिल्या टप्प्यातील स्वच्छतेचा आढावा घेणार आहे.
 
या मूल्यांकनानुसार मिळते गुणांकन   
जालना शहराच्या स्वच्छतेचे मूल्यांकनासाठी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आणि सर्वसमावेशक घनकचरा व्यवस्थापन योजना ५ टक्के, माहिती शिक्षण व वर्तणुकीत होणाऱ्या बदलाविषयी देवाणघेवाणीत ५ टक्के, घरोघरचा कचरा संकलन, झाडलोट, संकलन व वाहतूक ४ टक्के, प्रक्रिया आणि विल्हेवाट २० टक्के, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था १५ टक्के, वैयक्तिक शौचालय १५ टक्के आदी बाबींचा मूल्यांकनात समावेश आहे. माहितीचे संकलन, संवाद ४५ टक्के, प्रत्यक्ष निरीक्षण २५ टक्के, नागरिकांचा अभिप्राय ३० टक्के  या तीन प्रमुख भागांमध्ये विभागून श्रेणी देऊन यानुसार गुणांकन दिले जाते.
 
जालना अग्रस्थानी नेणार  
- शहरातील स्वच्छतेसाठी  पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे. अशी मोहीम राबवून पालिकेची श्रेणी वाढवून, स्वच्छतेच्या बाबतीत शहराचे नाव अग्रस्थानी नेणार आहोत.  संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, न. प. जालना.
 
यामुळे मिळणार कमी गुणांकन  
जालना शहरात सध्या जागोजागी तुंबलेल्या नाल्या,  रोज स्वच्छता न होणे, ओला व सुका कचऱ्याचे विभाजन न होणे, आठ वर्षांपासूनचा रखडलेला घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, कचऱ्याचे संकलन, वाहतुकीसाठीची सोय नसणे, भरलेल्या कचराकुंड्या, सामुदायिक शौचालय नसणे,  उघड्यावरच शौच आदी बाबींमुळे जालना पालिकेला दोन हजारांपेक्षा कमी गुणांकन पडू शकते.
 
दररोज सकाळी भेटी   
- प्रभागातील स्वच्छता राखण्यासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचे प्रबोधन केले जात आहे.  नुकतीच लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली. - संध्या देठे, नगरसेविका, जालना.
बातम्या आणखी आहेत...