आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकान बंद करण्यासाठी नागरिकांसह नगरसेवक सरसावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी  - शहरातील कारेगाव रस्त्यावर सुरू झालेल्या दारूच्या दुकानाविरोधात त्या भागातील नागरिकांसह नगरसेवकांनीही जोरदार मोहीम हाती घेतली असून कोणत्याही स्थितीत दुकान बंद न झाल्यास येत्या १५ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेनेही हे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी करणारे निवेदन बुधवारी (दि. १२) जिल्हा प्रशासनास दिले.  
 
वसमत रस्त्यावरील दारूचे दुकान यापूर्वी कारेगाव रोड परिसरात येणार होते. मात्र, तेथे नगरसेवक व नागरिकांनी केलेल्या विरोधानंतर तेच दुकान याच रस्त्यावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर दोन दिवसांपासून उघडले आहे. या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्रासह, खादी ग्रामोद्योग, वनसंरक्षक कार्यालय, न्यायाधीशांची निवासस्थाने, कल्याण मंडपम, पोलिस ठाणे तसेच कोचिंग क्लासेस चालतात. दररोज विद्यार्थी, विद्यार्थिनींसह नागरिकांची मोठी वर्दळ याठिकाणी असते. त्यामुळे या परिसरात दारू दुकानास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी सातत्याने पुढे आलेली आहे. तरीदेखील मागील दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी दुकान सुरू करण्यात आले आहे.  पहिल्याच दिवशी महापौर मीना वरपुडकर यांनी स्वत: दुकानासमोर जाऊन दुकान बंद करण्यास भाग पाडले होते. मात्र, पुन्हा ते सुरू झाले. या पार्श्वभूमीवर हे दारूचे दुकान येत्या दोन दिवसांत बंद करण्यात यावे, अन्यथा १५ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा नगरसेविका माधुरी बुधवंत, वनमाला देशमुख, उषा झांबड, अनिता सोनकांबळे, गटनेता चंदू शिंदे यांच्यासह विशाल बुधवंत, अक्षय देशमुख, रितेश जैन, गणेश टाक आदींनी दिला आहे.  
 
शिवसेनेचीही मागणी : कारेगाव रस्त्यावरील त्या दारू दुकानाचा परवाना तातडीने निलंबित करून हे दुकान या जागेवरून इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेने बुधवारी जिल्हा प्रशासनास दिले. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, नगरसेवक चंदू शिंदे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार आदींसह कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन दिले. 
बातम्या आणखी आहेत...