आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहारा नगरपंचायतीवर भगवा, भाजपला जनतेने स्पष्ट नाकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा - येथील नगरपंचायतच्या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत पहिल्या लोहारा नगरपंचायतवर भगवा फडकवला आहे. चार जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. सर्वच राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत प्रभाग १७ मध्ये मात्र बाळासाहेब कोरे या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. दरम्यान, प्रथमच स्वबळावर लढलेल्या भारतीय जनता पक्षाला लोहारेकरांनी साफ नाकारले अाहे. वाशीपाठोपाठ लोहाऱ्यातही भाजपला खाते उघडता न आल्याने जिल्ह्यात भाजप अद्यापही बळकटी धरू शकला नसल्याचे स्पष्ट झाले अाहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, माहूर, किनवटच्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

शासनाच्या धोरणानुसार तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. या नवीन नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यात शिवसेना १६ व एक पुरस्कृत, राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६ व १ अपक्ष अशा एकूण ७३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सोमवारी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मतमोजणी झाली. शिवसेनेसाठी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. आमदार चौगुले, तालुकाप्रमुख मोहन पणुरे शहरात चार दिवसांपासून ठाण मांडून होते. शिवसेनेने ८ जागांवर शिवसेना व एक पुरस्कृत अशा एकूण ९ जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला मात्र केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले.
देशात व राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने १३ जागांवर निवडणूक लढवली, मात्र एकही जागा पक्षाला मिळवता आली नाही. केवळ प्रभाग चारमध्ये तुलसी काळे यांनी काँग्रेसच्या सीमा लोखंडे यांना, तर प्रभाग १७ मध्ये सुरेश वाघ यांनी अपक्ष विजयी उमेदवार बाळासाहेब कोरे यांना काट्याची लढत दिली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, माहूर, किनवटच्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा... नायगाव समितीवर काँग्रेसची सत्ता... पिंपळनेरला भाजप... जालन्यातही भाजप