आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतबल शेतकरी : कपाशीला बोंडअळीचा फटका; अतिवृष्टीने बाधित तुरीवर नांगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथरूड - नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीने पाथरूड परिसरातील शेतकऱ्यांची यंदाही निराशा केली आहे. बळीराजाला चांगल्या उत्पन्नाची आशा असताना कीडरोगाने हल्ला चढवल्यामुळे प्रतिरोपास जेमतेम विसेक बोंडे लागली आहेत. इतर रब्बी पिके हातची गेली असतानाच कपाशीचेही अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे तुरीचे पीकही बाधित झाल्यामुळे उपटून टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळेचार वर्षांपासून भूम तालुक्यात शेतीतून उत्पन्न न मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. शेतकरी उत्पन्नाच्या आशेने पैसा लावून बसतो; परंतु उत्पन्न होत नाही. थोडके झाल्यास त्याला बाजारपेठेत दर मिळत नाहीत, असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे.
कपाशी चांगली आल्यास टप्प्याटप्याने शेतकऱ्याच्या हातात पैसे येत राहतात. माळरानासह बागायती कापूस म्हणूनही तालुक्यात हजारो हेक्टरवर लागवड करण्यात येते. वेळेवर चांगली पेरणी झाल्याने उत्पादन चांगले मिळण्याची आशा असते. मात्र, कपाशीवर कीडरोगाने हल्ला चढवला आहे. अळी बोंडांमध्ये घुसून कुरतडून टाकत असल्यामुळे पीक हाती लागत नाही. अतिवृष्टीमुळे पातेगळती, पानझडती, लाल्या रोग कपाशीवर पडला आहे. यामुळे प्रत्येक रोपास फक्त विसेक बोंडेच दिसून येत आहेत. यामुळे कपाशीच्या फक्त दोनेक वेचण्याच होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्याचे खर्चाने हाल
महागडी कीटकनाशके, खते, बियाणे, रोजंदारी असा मोठ्या प्रमाणात खर्च करूनही उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तूर पिकावरील क्षेत्रही मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने शेतकरी तूर उपटून टाकत आहेत. अतिवृष्टीचा कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना जबर फटका बसला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष शासनाच्या नुकसान भरपाईकडे लागले असून लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१५ दिवस उशिराने बोंडे
दरवर्षी दसऱ्याला कापूस वेचण्यास येतो; परंतु यंदा पंधरा दिवस उशिरा बोंडे फुटण्यास सुरुवात झाली. दिवाळीसाठी कपाशीतून चार पैसे हाताला लागतील ही अपेक्षा फोल ठरली आहे.

उत्पन्न तर दूरच, पदरचे १० हजारही गेले
दोन एकरांमध्ये दीड एकर तूर पेरली. अतिवृष्टीने नासाडी झाल्याने तूर उपटून टाकली आहे. यामुळे खतांसह, बियाणे, मजुरीचे १० हजार रुपये वाया गेले आहेत. आता सरकारकडून अनुदानाची अपेक्षा आहे. - दिगंबर चौगुले, शेतकरी (पाथरूड, जि.उस्मानाबाद).
लागवड खर्चही निघणार नाही
यंदाही कीडरोग व अतिवृष्टीमुळे पातेगळती झाली. यामुळे प्रति रोपास १२-१५ बोंडे आहेत. यातून केवळ एक-दोन वेचण्या होणार आहेत. यामुळे लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. -शेषराव खामकर, शेतकरी.
बातम्या आणखी आहेत...