आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचा साक्षीदार होण्याला मराठ्यांची कूच मंुबईला; ‘तपोवन, देवगिरी, नंदिग्राम’ने वादळ निघाले राजधानीला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे २ लाख समाजबांधव रवाना झाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. या मोर्चासाठी तीन दिवसांपासून दुचाकी, जीप, कार आणि ट्रकद्वारे समाजबांधव रवाना होत आहेत. त्यांच्यासाठी समाज बांधवांच्या वतीने जागोजागी सोय करण्यात आली आहे.  
 
शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आदर्श घालून देणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने अखेरचा एकत्रित मोर्चा म्हणून ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मंुबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जिल्ह्यात महिन्यापासून तयारी सुरू होती. मराठा समाजातील तरुणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत गावागावांत जाऊन जनजागृतीसाठी बैठका घेतल्या. तसेच पोस्टर्सद्वारे मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वपक्षीय नेत्यांनीही या बैठकीत उपस्थिती दर्शवून मोर्चासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. भव्य मोर्चामुळे आझाद मैदानापर्यंत पोहोचता यावे, यासाठी तरुणांनी शनिवारपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली. उस्मानाबाद शहरातील हजारो तरुणांनी दुचाकीवरून मुंबईचा मार्ग धरला. भगवे ध्वज लावून दुचाकीवरून तरुण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांचे स्वागत समाजबांधवाच्या वतीने करण्यात आले. 

आचारसंहिता...  
या मोर्चात लाखोंच्या संख्येने महिला, बांधव सहभागी होणार असल्याने काही गडबड किंवा गोंधळ होऊ नये यासाठी आयोजकांनी आचारसंहिताही लागू केली आहे, ज्याचे पालन मोर्चातील सगळ्यांनीच करावयाचे आहे. 
- मोर्चा मूक असल्याने एकमेकांशी बोलायचे नाही, घोषणा द्यायच्या नाहीत
- अधिकृत बॅनरशिवाय कोणत्याही वैयक्तिक संस्था, संघटनांचे बॅनर लावण्यात येणार नाहीत
- मोर्चात महिला, भगिनी पुढे असतील त्यांना सहकार्य करणे, कुणालाही त्रास होणार नाही, असे प्रत्येकाचे वर्तन असावे
- स्वयंशिस्त पाळणे आदी 
- बाबींचे पालन करण्याची आचारसंहिता घालून दिल्याने मोर्चा शांततेत पार पडेल, असेही आयोजकांनी सांगितले.

लातूर : प्रत्यक्ष भेटी, बैठका, मार्च, रॅलीसह सोशल मीडिया
जिल्ह्यातील विविध गाव-शहरांतून मराठा समाजबांधवांचे जथ्थे मुंबईला रवाना झाले. प्रत्यक्ष भेटी, बैठका, मार्च,  रॅली, सोशल मीडिया, पत्रके, फलक, संदेश अशा माध्यमातून मराठा समाजातील सर्वांना या मोर्चाबद्दलची माहिती देण्यात आली होती. अनेकांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबई गाठली. सोमवारी बरेच जण रेल्वे, बसेस, ट्रॅव्हल्स, अन्य खासगी वाहनांनी  मुंबईला रवाना झाले. दरम्यान, लातूर येथील बांधवांच्या निवासाची व वाहनतळाची व्यवस्था नवी मुंबई परिसरातील नेरुळ पश्चिम येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, तेरणा पब्लिक स्कूल  तसेच ऐरोली येथील मांजरा  कॉलेज ऑफ लॉ सुशीलादेवी विद्यालय कॅम्पस येथे करण्यात आल्याचे मराठा क्रांतीच्या वतीने सांगण्यात आले. 

परभणी : पंधरा दिवसांपासून जागृती
सकल मराठा समाजाने मुंबईत क्रांती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोर्चासाठी मंगळवारी (दि.आठ) सकाळपासूनच परभणी शहरासह जिल्ह्यातील हजारो मराठा समाजबांधव रेल्वे, बसेस व खासगी वाहनांद्वारे रवाना झाले.  

सकल मराठा समाजातर्फे गेल्या पंधरा दिवसापासून शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बैठका, गाठीभेटी, तालुकास्थानासह खेड्यापाड्यांतून संपर्क अभियान राबवून त्याद्वारे जनजागृती केली होती. सर्वच तालुकास्थानी गेल्या आठवड्यात समाज बांधवांनी दुचाकी, तिचाकी वाहनांची मोठी रॅली काढली. त्या रॅलीद्वारे वातावरण निर्मिती केली. या रॅलीमधून हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.  

सोमवारी सायंकाळपासूनच रेल्वे, बसेस व खाजगी वाहनांद्वारे त्या-त्या तालुकास्थानांसह खेड्या-पाड्यांमधून हजारो बांधव मुंबईस रवाना झाले. मंगळवारी सकाळी तपोवन एक्स्प्रेसद्वारे हजारो बांधव प्रचंड घोषणाबाजी करीत मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी सचखंड एक्स्प्रेसद्वारे सुद्धा काहींनी मनमाडकडे कूच केली.  जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते वाहनांद्वारे रवाना झाले. सेलू तालुक्यातील कार्यकर्ते रेल्वेने तर सोनपेठ येथील कार्यकर्ते परळी मार्गे वाहनांद्वारे मुंबईस रवाना झाले. गंगाखेड येथील कार्यकर्त्यांनी पनवेल एक्स्प्रेसद्वारे मुंबईस प्रस्थान केले. पूर्णा, परभणी तालुक्यातील कार्यकर्ते तपोवन, देवगिरी व नंदीग्राम एक्स्प्रेसद्वारे मोर्चास रवाना झाले आहेत. या जिल्ह्यातून मोर्चास जाणाऱ्या समाज बांधवांची संख्या लक्षणीय अशी आहे.

हिंगोली : जिल्हाभरातून बैठकांना प्रतिसाद
जिल्ह्यातून सुमारे ४ हजार समाजबांधव रवाना झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली आणि बैठकांना जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः रॅलीमध्ये महिला, विद्यार्थिनी आणि तरुणांची संख्या मोठी होती. गेल्यावर्षी येथे काढण्यात आलेल्या मोर्चाने जिल्ह्यात एक उचांक निर्माण केला होता. 

नांदेड : समाजबांधवांचा जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद
मुंबईत ९ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या सकल मराठा समाजाच्या भव्य मोर्चासाठी नांदेड शहरासह जिल्ह्यातून सुमारे ३० हजार बांधव मुंबईला रवाना झाल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तत्पूर्वी या मोर्चाच्या जनजागृतीसाठी बुधवार, २ ऑगस्ट रोजी नांदेड शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यालाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.  नांदेड येथून मोर्चासाठी सात व आठ ऑगस्टपासूनच मराठा बांधव मोर्चासाठी नंदिग्राम व देवगिरी एक्स्प्रेस या गाडीने मुंबईला रवाना झाले आहेत. याबरोबरच अनेक बांधव, महिला, मुली या रेल्वेसह खासगी गाड्यांतूनही रवाना झाले.

बीड : मिळेल त्या गाडीने एक लाख मराठा मोर्चासाठी
बीड जिल्ह्यातून सुमारे एक लाख मराठा बांधव मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईला रवाना झाले अाहेत.  नऊ अाॅगस्ट क्रांतिदिनी मुंबई येथे मराठा क्रांती महामाेर्चा निघणार अाहे. या महामाेर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरासह जिल्ह्यामध्ये िठकठिकाणी जनजागृतीसाठी  बैठका, दुचाकी फेरी काढल्या तसेच  साेशल मीडियाचाही माेठ्या प्रमाणावर वापर करण्यात अाला. बीड जिल्ह्यातील गावागावांतून मराठा समाजबांधव, युवक, युवती, महिलांनी माेर्चामध्ये सहभागी हाेण्याचा संकल्प जागृती फेरीमधून केला हाेता.  मुंबई येथे िनघणाऱ्या क्रांती माेर्चात सहभागी हाेण्यासाठी समाजबांधव मिळेल त्या वाहनाने रवाना झाले अाहेत.  

जालना : जिल्ह्यातून युवक, युवती दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल 
जालना जिल्ह्यातून ५० हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी होत आहेत. यातील हजारो बांधव मंगळवारी सकाळपासूनच मुंबईकडे रवाना झाले होते. यात चारचाकी वाहनाने जाणाऱ्या बांधवांची संख्या अधिक आहे. तर जिल्ह्यातून महिला व युवतीही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत.  

जिल्ह्यातून जाणाऱ्या बहुतांश युवकांनी चारचाकी वाहनांचा पर्याय निवडला होता. काही जणांनी रेल्वेने जाणे पसंत केले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे फुल्ल झाल्या आहेत. ज्यांना मुंबईत निवासाची व्यवस्था होती असे अनेक बांधव दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. त्या नंतर टप्प्याटप्प्याने रवाना होत आहे.
बातम्या आणखी आहेत...