आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहाऱ्यात मराठा बांधवांचा एल्गार, आरक्षणासाठी मूकमोर्चा; हजाराेंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजात गडबड-गोंधळ नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, काेपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा आदी मागण्यांसाठी लोहारा तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मराठा मूकमोर्चा काढण्यात आला.  ना घोषणा ना गडबड, अगदी शांततेत, प्रचंड शिस्तीत, आपल्या न्याय्य व हक्काच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आले होते.
    
कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना ६ महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्या, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी ( दि.४ )  लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. सकाळी ९ वाजल्यापासूनच तालुक्यातील विविध गावांतील मराठा समाज बांधव लोहारा शहरात दाखल होत होते. हातात भगवा झेंडा, मागण्यांचे फलक, डोक्यावर भगवी टोपी, खिशावर काळी रेबीन लावून लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक  लोहारा शहरात दाखल होत होते. लोहारा शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहनाच्या रांगा व समाज बांधवांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. लोहारा बसस्थानकावर समाजबांधव दाखल झाले होते. बघता बघता बसस्थानकाचे मैदान भगवेमय झाले होते. 
    
या मोर्चाची १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. गावोगावी जाऊन मोर्चाबद्दल जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे हा मोर्चा ऐतिहासिक होणार याचा अंदाज होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव, महिला, युवक, मुली हातात भगवे ध्वज घेऊन व काळ्या फिती लावून व हातात विविध मागण्यांचे फलक व बॅनर घेऊन सहभागी झाले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. प्रथम घोड्यावर स्वार असलेली जिजाऊंची वेशभूषा परिधान केलेली युवती, सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान केलेले चिमुकले यांच्या मागे युवती, महिला, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, पुरुष व सर्वात शेवटी राजकीय नेते या क्रमाने शहरातील बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा सुरु झाल्यापासून अत्यंत शिस्त होती. या मोर्चासाठी काळे टी शर्ट घातलेले स्वयंसेवक हाताचे कडे करून मोर्चा मार्गस्थ करण्यासाठी नियोजनाप्रमाणे गट तयार करत होते. अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने निघालेला हा मूकमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयासमोरील मैदानावर पोहोचला. या मोर्चास मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला होता. 
 
या वेळी  मुस्लिम समाज, लोहारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, शिवम एजन्सी यांच्या वतीने पाण्याचे वाटप करण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. त्यानंतर युवतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना तत्काळ फाशी द्यावी,  मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या, यासह अनेक तीव्र भावना या वेळी युवतींनी व्यक्त केल्या. यानंतर ५ युवतींनी तहसील कार्यालयात जाऊन  तहसीलदार डॉ. रोहन काळे यांना सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली. या मोर्चासाठी अग्निशामक दलाची गाडी, डॉक्टर पथक व रुग्णवाहिका सज्ज होती. तसेच या मोर्चासाठी नगरपंचायत लोहाराच्या वतीने पाण्याचे टँकर उभा करण्यात आले होते. तसेच मोर्चादरम्यान कुठलाही कचरा होऊ नये यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या.   

मोर्चातील शिस्तीची परंपरा कायम    
आतापर्यंत निघालेल्या सर्व मराठा क्रांती मोर्चात शिस्त दिसून आली होती. याही मोर्चात ती शिस्त पाहायला मिळाली. कुणीही न बोलता आपला नि:शब्द हुंकार देत पुढे चालत होते. मोर्चा झाल्यानंतर स्वयंसेवकांनी सर्व ठिकाणी स्वच्छता करून मोर्चाची ही शिस्त कायम ठेवली.
    
जिजाऊ व बाल शिवबाने वेधले सर्वांचे लक्ष    
या मोर्चात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेले बाल चिमुकले सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. 
बातम्या आणखी आहेत...