परभणी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींचेदेखील लोकशिक्षण व्हावे या उद्देशाने मराठवाडा जनता विकास परिषदेने जनतेचा जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प केला आहे. रविवारी (दि. आठ) येथे झालेल्या विभागीय बैठकीत याबाबतचा ठराव घेण्यात आला.
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची व्यापक बैठक येथील शारदा महाविद्यालयात रविवारी झाली. बैठकीस परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, शरद अदवंत, ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन, माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर जनता विकास परिषदेने केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शासकीय पातळीवर ठिकठिकाणी केलेल्या प्रयत्नांची मांडणी करण्यात आली. अॅड. प्रदीप देशमुख यांनी जनता विकास परिषदेने पाण्याचा अनुशेष असो की रेल्वेविषयी प्रश्न - त्या त्या स्तरावर मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे, असे सांगितले. मराठवाड्यातील पाण्याच्या अनुशेषासंदर्भात गांभीर्याने चर्चा करण्यात आली. पाण्याचा अनुशेष अनुषंगाने सातत्याने प्रयत्न सुरू असताना राज्य शासनाकडून कार्यवाहीच्या दृष्टीने फारसे सकारात्मक प्रयत्न होत नसल्याची टीका या वेळी करण्यात आली. सरकारने अनुशेषाच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत यासाठी परिषदेच्या वतीने विविध मार्गांनी सरकारवर दबाव आणला जाईल, असा इशारा या वेळी मान्यवरांनी दिला. मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परळी-बीड हा मार्ग प्रलंबित असून मार्गी लागावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींचे लोकशिक्षण व्हावे यासाठी मराठवाड्यातील जनतेचा जाहीरनामा करण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला. बैठकीस परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ थोरे, रामकृष्ण पांडे, हेमा रसाळ, अॅड. प्रताप बांगर, अनंतराव देशमुख, त्र्यंबकराव सुगावकर, महापौर संगीता वडकर आदी उपस्थित होते.