आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१ लाख २१ हजार मुस्लिम बांधव एकवटले, मराठा, दलितांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरक्षणासाठी मराठा समाजाने मराठवाड्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्यापाठोपाठ दलित ऐक्य मोर्चेे काढण्यात आले. मंगळवारी मुस्लिम बांधवांनीही जालना, बीड, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत मोर्चे काढले.
मराठा, दलितांचा सहभाग
लातूर | मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी जमिअत उलेमा ए हिंद संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. लातुरात निदर्शने तर औसा आणि चाकूर येथे मोर्चा काढून मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाफिज अ. जब्बार मजाहिरी, कार्याध्यक्ष मौलाना अजिमोद्दीन मणियार, जनरल सेक्रेटरी मुफ्ती ओ.एस. कासमी आदी सहभागी झाले होते. औसा येथे काढण्यात आलेल्या मुस्लिम आरक्षण मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला. मोर्चात जवळपास १५ हजार मुस्लिमांबरोबरच मराठा व दलित बांधवही सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. अतिशय शांततेत हा मोर्चा काढण्यात आला.

शांततेत आंदोलन
हिंगोली | मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय व वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शांततेत मूकमोर्चे काढण्यात आले. जमियत-उलेमा-ए-हिंद जिल्हा शाखेने मोर्चाचे नेतृत्व केले. येथील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मुफ्ती शफिक खान यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मोर्चे झाले. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी गठित आयोगांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

पाणी पाऊच वाटप
सेलू | सेलूतील हजारो मुस्लिम बांधवांनी मंगळवारी मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत शासनाकडे आरक्षणाची मागणी लावून धरली. दरम्यान, मोर्चाला पाठिंबा दर्शवत सकल मराठा बांधवांतर्फे छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले. इतर संघटना आणि मित्रमंडळातर्फेही मुस्लिम समाजाच्या मोर्चास पाठिंबा दर्शविण्यात आला. तसेच मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चानंतर रस्त्यावरील रिकामे पाणी पाऊच व इतर कचरा उचलून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.

परंड्यात एकदिवसीय आंदोलन
परंडा | शहरातील जमिअत उलमा-ए-हिंद शाखेच्या वतीने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि.१८) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंादोलनात जमिअत उलमा-ए- हिंद शाखेचे अध्यक्ष मौलाना जफर युसुब काझी, सचिव मुर्जुजा महेबुबखाँ पठाण, नगरसेवक जाकीर सौदागर, वाजीद दखनी, ॲड. नुरोद्दीन चौधरी, हारुण पठाण आदी सहभागी झाले होते.

परभणी शहरात आज धरणे
परभणी | जिल्ह्यातील नऊ पैकी सहा तालुक्यांच्या ठिकाणी तेथील तहसील कार्यालयांवर मुस्लिम बांधवांतर्फे मोर्चे काढण्यात आले. पाथरी आणि जिंतुरात धरणे आंदोलनही करण्यात आले तर परभणी शहरात बुधवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी पाथरी आणि जिंतूर तालुक्यात हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला. तसेच सोनपेठ, पालम, गंगाखेडमध्ये मोठे मोर्चे काढण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...