आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ; एक्स्पायरी डेट परस्पर वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मुदतबाह्य झालेली औषधी नवे लेबल लावून विक्रीसाठी बाजारात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्मण संभाजी रेवणवार यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वसामान्य लोकांच्या जीविताशी औषध विक्रेते किती बेपर्वाईने खेळ करतात या निमित्ताने उघडकीला आले.

लक्ष्मण संभाजी रेवणवार यांच्याकडे औषध विक्रीचा होलसेलचा परवाना आहे. सिडको भागातील एमआयडीसीमध्ये प्लाॅट नं. डी-१०१ येथे त्यांचा औषधीचा साठा आहे. त्यांची स्वत:ची क्रिशमेड नावाची औषधीची मार्केटिंग कंपनी आहे. तिचे प्रशासकीय कार्यालय मुंबईतील चेंबूर येथे आहे. रेवणवार यांनी उत्तराखंडातील एस. फार्मा या कंपनीकडून औषधी मागवली. यात फेनिड एएस या औषधीचा साठा आहे. अॅनिमियाच्या रुग्णाला विशेषत: महिला व बालकांना रक्तवाढीसाठी हे औषध दिले जाते. या औषधीचे बाजारमूल्य १०५ रुपये आहे. औषधीची मुदत एप्रिल २०१४ मध्येच संपली. नियमाप्रमाणे मुदतबाह्य झालेली औषधी ही नष्ट करणे गरजेचे आहे. अशा औषधीच्या सेवनाने रुग्णाचे जीवित धोक्यात येऊ शकते.
२ वर्षांनी मुदत वाढवली
रेवणवार यांनी मुदतबाह्य झालेली औषधी नियमाप्रमाणे नष्ट केली नाही. गोदामात त्यांनी काही रोजंदारीवर मुले लावून या औषधीच्या सर्व बाटल्या पाण्यात बुडवून ठेवल्या. त्या बाटल्या पाण्यात मुरल्यावर त्यावरील लेबल काढण्यात आले. त्या लेबलच्या जागी औषधीची मुदत दोन वर्षांनी वाढवून घेतलेलेे नवीन लेबल लावण्यात आले.
केस दाबण्याचा प्रश्नच नाही
- आम्ही धाड मारल्यानंतर गोदामाला सील ठोकले. त्याची रीतसर पोलिस ठाण्यात नोंद घेतली. प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारितील असल्याने त्यांच्या तक्रारीशिवाय गुन्हा दाखल करता येत नव्हता. जीविताशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रश्नच नसल्याने गुन्हा दाखल केला.
गजानन सैदाने, पोलिस निरीक्षक, नांदेड ग्रामीण पोलिस ठाणे
औरंगाबादला असल्याने विलंब
^ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली त्या वेळी मी मीटिंगमध्ये औरंगाबादला होतो. त्यामुळे कारवाई करण्यासाठी वेळ लागला. प्रकरण गंभीर असल्याने आम्ही वरिष्ठांपर्यंत याची माहिती दिली. नियमाप्रमाणे औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
नामदेव भालेराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग
बातम्या आणखी आहेत...