आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमाभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - सीमावर्ती भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्याचा वेळेत तपास लावण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पुढाकारातून लातूरसह नांदेड व बिदर येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उदगीर येथे बुधवारी बैठक घेण्यात आली. या वेळी तिन्ही जिल्ह्यांतील गुन्हे व गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.
लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, बिदर (कर्नाटक) चे पोलिस अधीक्षक प्रकाश निकम, नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डोईफोडे, लातूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड, तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक गुन्हे शाखांचे पोलिस निरीक्षक, सीमावर्ती भागातील पोलिस ठाण्याचे अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्हा नांदेड व कर्नाटकातील बिदरच्या सीमेलगत आहे. या भागात अनेक गुन्हे घडतात. एका जिल्ह्यातील गुन्हेगार दुसऱ्या जिल्ह्यात गुन्हा करून आपल्या जिल्ह्यात परततो, मुद्देमालाची विल्हेवाट लावतो. खुनाच्या घटना घडतात. ओळख पटू नये म्हणून एका जिल्ह्यातील मृतदेह दुसऱ्या जिल्ह्याच्या हद्दीत टाकला जातो. याला आळा घालण्यासाठी व तपास वेळेत लावण्यासाठी सीमाभागातील पोलिसांचे सहकार्य व समन्वय गरजेचा व अनिवार्य असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना वाटले व त्यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. प्रारंभी त्यांनी ही संकल्पना बिदर व नांदेडच्या पोलिस अधीक्षकांना सांगितली व त्यांच्या सोयीनुसार बैठक घ्यावी, असेही सुचवले. त्याला नांदेड व बिदरच्या एसपींनी होकार दिला. उदगीर हे सोयीचे ठिकाण असल्याने तेथे बैठक घेण्यात आली. यात तिन्ही जिल्ह्यांतील गुन्हेगारांची माहिती, कारागृहात असलेले कैदी, फरार कैदी याबाबत चर्चा झाली. तपासकामी तसेच मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे, सीमाभागात अनोळखी मृतदेह आढळला तर एकमेकांना कळवणे, हरवलेल्या व्यक्ती, मुले याची एकमेकांना माहिती देणे, नाकेबंदीच्या वेळी मदत करण्याचे बैठकीत ठरल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
गुन्हेगारीवर नियंत्रण येईल
सीमावर्ती भागात घडणाऱ्या गुन्हेगारीवर या बैठकीमुळे नियंत्रण येणार आहे. जो मनसुबा ठेवून सीमा भागातील गुन्हेगार गुन्हे करतात त्यांचा उद्देश सफल होणार नाही. ते पोलिसांच्या हाती सहज लागतील.
डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक, लातूर