आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदायी योजनेतून रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने तात्काळ रद्द करावे - मंत्री दीपक सावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर – महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेतून रुग्नालायांमार्फत रुग्णांची होणाऱ्या लुटीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, यावर आळा घालण्यासाठी जीवनदायी योजनेतून रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांचे योजनेतून तत्काळ परवाने रद्द करावेत, अशा सुचना आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिल्या आहेत.
 
जीवनदायी योजनेतील त्रुटी जाणून घेऊन आगामी महात्मा जोतीबा फुले योजनेत या त्रुटींची सुधारणा होणेबाबत मंत्रालय स्तरावर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी आज (मंगळवारी) व्यापक बैठक पार पडली. 

या बैठकीच्या सुरवातीस आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसून, रुग्णांची आर्थिक लुट होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. असे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर यावर प्रशासनाचे नियंत्रण नसून ठराविक रुग्णालयांचा मनमानी कारभारास खतपाणी घातले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे जीवनदायी योजनेतून रुग्णांची होणारी लुट थांबवावी, यासह रुग्णालयांसमोर उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन आगामी महात्मा जोतीबा फुले योजनेमध्ये या त्रुटींचे निराकरण व्हावे, अशी मागणी केली. याकरिता प्रशासन आणि रुग्णालयांची येत्या १५ दिवसात बैठक पुन्हा बैठक घेऊन महात्मा जोतीबा फुले योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

या बैठकीमध्ये पुढे बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, कर्नाटक आदी भागातून रुग्ण उपचाराकरिता येत आहेत. याचा अतिरिक्त भार कोल्हापूर शहरातील रुग्णालयांवर आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु करवीर आणि आसपासच्या तालुक्यामध्येच ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. इतर तालुके दुर्गम असल्याने त्याठिकाणी अध्ययावत रुग्णालयांची संख्या नगण्य असल्याने ही योजना शहराच्या आसपासच प्रभावी राबविली जात आहे. सध्या या योजनेंतर्गत शासनाची १८ रुग्णालयाची मर्यादा असताना खास बाब म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ३२ रुग्णालय मंजूर करण्यात आले आहेत. ज्या तालुक्यामध्ये हॉस्पिटल नाहीत, त्या ठिकाणी फुले जन आरोग्य योजनेचे काम सुरु करण्याच्या दृष्टीने शासनाचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. या ३२ रुग्णालयातील एक रुग्णालय शासकीय असून उर्वरित ३१ रुग्णालय खाजगी आहेत. परंतु राजीव गांधी योजनेसंदर्भात रूग्णालयाकडून रुग्णांच्या होणाऱ्या लुटीच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत. अशा सुमारे ४२० तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. रुग्णांच्या तक्रारी पाहता, काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये योजनेचा लाभ रुग्णांना देण्यास टाळाटाळ केली जाते. रुग्ण दाखल झाल्यानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ रुग्णास दोन ते तीन दिवसानंतर दिला जातो. तोपर्यंत रुग्णाकडून हजारो रुपयांचे बिल वसूल केले जाते.
अशा तक्रारी येऊनही कारवाई होत नसल्याने रुग्णालयांचा मनमानी कारभार असाच सुरु आहे. यावर तातडीने नियंत्रण आणावे आणि रुग्णांची होणारी लुट थांबबावी, अशा मागणी करीता आमदार राजेश क्षीरसागर यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रुग्णलयांना वेळेत अनुदान मिळत नसल्याने या रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर विपरीत परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून दिला. रुग्णालय प्रशासनास असणाऱ्या तक्रारींचा पाढाही या बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाचला.

 यावर महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेतून रुग्णलयांमार्फत रुग्णांची होणाऱ्या लुटीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, यावर आळा घालण्यासाठी जीवनदायी योजनेतून रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांचे योजनेतून तत्काळ परवाने रद्द करावेत, अशा सक्त सुचना आरोग्यमंत्री  दीपक सावंत यांनी दिल्या.

यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, आगामी महात्मा जोतीबा फुले योजनेमध्ये या त्रुटीवर उपाययोजना करून ही योजना गोरगरीब रुग्णांसाठी लवकरात लवकर कार्यान्वित करावी. कोल्हापूर जिल्हासह आसपासच्या जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातून येणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार होण्याकरिता रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी करीत या योजनेंतर्गत फक्त उपचारासाठी पैसे दिले जात असून, उपकरणे उपलब्ध नसताना रुग्णावर उपचार होणे कठीण असल्याचे सांगत, या योजनेतून उपकरणे खरेदी करण्याची मुभा मिळावी आणि या योजनेमध्ये आजारांची संख्या वाढवावी अशी मागणी हि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
यावर मंत्री दीपक सावंत यांनी, महात्मा फुले आरोग्य योजना तातडीने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसात कोल्हापूर येथे बैठक घ्यावी. या बैठकीत सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सखोल अभ्यास होऊन या समस्यांचे निराकरण होण्याबाबत पर्यायांची अंमलबजावणी करावी, अशा सुचना दिल्या. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शासकीय रुग्णालयांच्या परिस्थितीत सुधारणा झाली असून, गरजू रुग्णांनी शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेण्याबाबत शासनाने आवाहन करावे, अशी विनंती आरोग्य मंत्री सावंत यांच्याकडे केली.

 या बैठकीस आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक, आरोग्य विभागाचे सचिव व्यास, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल. एस. पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील, आदी उपस्थित होते.  
बातम्या आणखी आहेत...