आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमधील भाजपच्या बंडखाेरांची केंद्रीय मंत्री गडकरींकडून मनधरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ असलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधील महापालिका निवडणुकीतच भाजपमध्ये माेठ्या प्रमाणावर बंडखाेरी उफाळून अाल्यामुळे पक्षाची डाेकेदुखी वाढली अाहे. सुमारे दाेन डझनहून अधिक बंडखाेरांनी भाजप उमेदवाराविराेधात निवडणूक लढविण्याची तयारी केली असून त्यात काही संघ निकटवर्तीयांचही समावेश अाहे. समजूत काढण्याची जबाबदारी गडकरींसह भाजप अामदारांवर साेपवण्यात अाली अाहे, तर दुसरीकडे  या वादात न पडण्याची भूमिका संघनेत्यांनी घेतल्यामुळे भाजपची पंचाईत वाढली आहे.   

संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात बजरंग दलाचे माजी शहरप्रमुख सुबोध आचार्य आणि विहिंपचे माजी शहरप्रमुख श्रीकांत आगलावे या दोन्ही नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी मनोज चाफले यांना उमेदवारी देण्यात अाली. चाफले हे काही काळ काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सहकारी होते. याच प्रभागात वंदना यंगटवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर धडकून संताप व्यक्त केला. भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद रिसालदार यांनी बंडाचा झेंडा फडकावला असून ते बंडखोरांचे पॅनल घेऊनच लढत देणार आहेत. शेजारच्याच प्रभागात हितेश जोशी, नाना पडोळे, जे. पी. शर्मा या भाजप नेत्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. पक्षाचे अधिकृत उमेदवार मेघराज मैनानी यांच्याविरोधात त्यांनी मिरवणूकही काढली.   

संघाचे स्मृती भवन असलेल्या रेशीमबाग प्रभागात भाजपचे कार्यकर्ते अतुल सेनाड यांनी बंडखोरी करून बसपाच्या वतीने उमेदवारी दाखल केली. सीताबर्डी परिसरात बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रसन्न पातूरकर यांनीही बंडाचा झेंडा उभा केला असून तेदेखील बंडखोरांचे पॅनल घेऊन आव्हान देणार आहेत. या बंडखोरीने हादरलेल्या भाजपने आता सर्व आमदारांना कामाला लावले आहे. स्वत: नितीन गडकरी यांनी रविवारी सकाळी वाड्यावर अनेक बंडखोरांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. काही बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात कधी येतात याची प्रतीक्षा अाहे. प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम नागपुरात पक्षाकडून झालेल्या उमेदवारी वाटपावर नाराजी व्यक्त करण्यासाठी बंडखोर नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत.   
 
संघनेत्यांच्या घरातच बंडाचे निशाण  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र आणि गुजरात अशा पश्चिम क्षेत्राचे प्रचारक रवींद्र जोशी यांच्या चुलत भावाची पत्नी डॉ. विशाखा जोशी यांनी भाजपचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दाखल केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभागात त्या निवडणूक लढवत अाहेत. डॉ. विशाखा जोशी या भाजपच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीप्रमुख होत्या. नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच आपण बंडाचा झेंडा उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...