लातूर - अल्पवयीन मुलींना हेरून पळवून न्यायचे आणि पैसे घेऊन त्यांचे विवाह लावून देणारी टोळी लातूर एमआयडीसी पोलिसांनी पकडली आहे. विशेष म्हणजे वधू-वर सूचक मंडळाचे नाव वापरून हा प्रकार एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्तीकडून सुरू होता.
गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीला पळवण्यात आले होते. तिला आर्वी रस्त्यावरील शेजारच्याच महिलेने पळवल्याचे त्या मुलीचे आईचे म्हणणे होते. पोलिसांनी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली. मात्र गांभीर्याने तपास केला नाही. महिना उलटून गेला तरी पोलिस तपास करीत नाहीत, अशी तक्रार घेऊन ती महिला पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्याकडे गेली. राठोड यांनी प्रकरणाचा तपास करण्याची सक्त ताकीद दिल्यानंतर एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुधाकर बावकर यांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावर तिने त्या मुलीला सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे नेऊन पैशांच्या मोबदल्यात तिचा विवाह लावून दिल्याचे कबूल केले. हा सगळा प्रकार शहरातील पूनम शहाणे या महिलेच्या पुढाकाराने झाल्याचेही तिने कबूल केले. पोलिसांनी पूनम शहाणेसह याप्रकरणात १० जणांना अटक केली.
पूनम आहे म्होरक्या
पूनम शहाणे ही महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे सांगते. ती वधू-वर सूचक मंडळ चालवायची. अलीकडच्या काळात मुलींची संख्या कमी झाल्यामुळे पैसे देतो, पण मुलगी शोधून द्या म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पूनमने साथीदार महिलांच्या मदतीने गरीब घरातील चांगल्या अल्पवयीन मुली हेरायच्या आणि त्यांना पळवून नेण्याचे प्रकार केले. या पळवलेल्या मुलींना परजिल्ह्यात आणि परराज्यात नेऊन पैसे घेऊन त्यांचा विवाह लावून देण्यात येत असे.