आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा बंधाऱ्यांमुळे दिंद्रुड पाण्याने झाले स्वयंपूर्ण, लोकसहभागामुळे टँकरग्रस्त गाव म्हणून शिक्का पुसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - टँकरमुक्तीसाठी गावातील  सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येत गावात जलयुक्त शिवार योजना, नाम फाउंडेशन व लोकप्रतिनिधींकडून  कोट्यवधींचा निधी खेचून आणला. या निधीतून गावात सहा बंधारे बांधल्याने  पावसाळ्यात गावात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरल्याने  गावातील हातपंपाबरोबरच नळ योजनेच्या विहिरीलाही पाणी आले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गाव पाण्याने स्वयंपूर्ण झाले असून आज टँकरग्रस्त गावाचा शिक्का पुसला गेला आहे. एकेकाळी पाणमळ्यासाठी प्रसिद्ध झालेल्या गावाला टँकरमुक्तीमुळे गतवैभव प्राप्त झाले आहे.  

४५ गावांची  बाजारपेठ  असलेल्या दिंद्रुडची लोकसंख्या १० हजार आहे.  परळी-बीड या राज्य महामार्गावरील हे गाव मागील  चार वर्षांपासून टंचाईचा सामना करत आहे. पावसाळा संपताच नोव्हेंबर महिन्यात  गावाला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या  लागत असल्याने  टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. गावची लोकसंख्या दहा हजार असल्याने  दोन टँकरवर  तहान भागत  नसल्याने ग्रामस्थांना  पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत होती. ही परिस्थीती पाहून गाव  टँकरमुक्त करण्यासाठी सरपंच ज्योती अतुल ठोंबरे  ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकसहभागातून गावाजवळील सरस्वती नदीचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले. या गावातील लोकसहभगाची दखल घेत शासनानेही  जलयुक्त शिवार योजनेतून गावात चार बंधारे उभारण्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी दिल्याने बंधाऱ्याचे काम मार्गी लागले. नाम फाउंडेशनने २५ लाख, तर राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांच्या   खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी  बंधाऱ्यासाठी दिला. मागील वर्षी परतीचा मान्सून बरसल्याने  गावातील सहा बंधारे तुडुंब भरले. टँकरच्या भरवशावर असणाऱ्या या  गावातील १० हातपंप, पाणीपुरवठ्याची विहिरी तुडुंब भरल्या आहेत. गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटला असून टँकरग्रस्त गाव म्हणून शिक्का पुसला गेला आहे.   
 
लोकसहभागातून चळवळ  
; दिंद्रुडची  ओळख टँकरग्रस्त गाव   म्हणून होती.  हिवाळ्यातसुद्धा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. टंचाई निवारणासाठी गावात लोकसहभागातून चळवळ सुरू झाली. या चळवळीला पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. आर. टी. देशमुख,  गावचे भूमिपुत्र असणारे मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी साथ  दिली. त्यामुळे गावचे रुपडे पालटले आहे.  
ज्योती ठोंबरे, सरपंच, दिंद्रुड  
 
गतैवैभव प्राप्त झाले  
; दिंद्रुड ग्रामस्थांना चार वर्षांपासून पाणी-पाणी करण्याची वेळ आली होती. यामुळे पाणमळ्याचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव टंचाईग्रस्त गाव म्हणून समोर आले होते. परंतु ग्रामस्थांची एकजूट व प्रशासनाची मिळालेली साथ यामुळे गावाला गतवैभव प्राप्त झाले आहे. सध्या गावात पाणी असल्यामुळे गावांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  
बाजीराव काशिद, ग्रामस्थ, दिंद्रुड
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...