आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापाचा उद्रेक : ट्रेनचा दरवाजा बंद; संतप्त प्रवाशाची दगडफेक, महिला प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद स्टेशनवर लातूर-मुंबई ट्रेनची काच फोडण्यात आली. - Divya Marathi
उस्मानाबाद स्टेशनवर लातूर-मुंबई ट्रेनची काच फोडण्यात आली.
उस्मानाबाद - मुंबई-लातूरएक्स्प्रेस बीदरपर्यंत वाढविल्याने लातूर, उस्मानाबादचे प्रवाशी संतप्त असून रविवारी (दि.७) रात्री २३.५५ वाजता उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर लातूर येतून रेल्वे आल्यावर आतले प्रवासी बोगीचे दरवाजेच उघडत नसल्याने संतापलेल्या प्रवाशाने ट्रेनवर दगड भिरकावले. यात खिडकीच्या काचा फुटून एक महिला जखमी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 
 
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासह सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील प्रवाशांची सोय व्हावी म्हणून २००८ मध्ये लातूर-मुंबई ही एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, सुरुवातीपासूनच या रेल्वेमध्ये जागा मिळण्यावरून उस्मानाबादच्या प्रवाशांचे हाल झाले. अगोदरच लातूर येथूनच रेल्वे गच्च भरून येत असल्याने आणि लातुरकडून आलेले प्रवासी डब्याचा दरवाजा उघडत नसल्याने यापूर्वीही अनेकदा उस्मानाबाद स्थानकावर वादावादीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सदरील रेल्वे बीदरपर्यंत वाढविण्यात आल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली आहे. या मुद्द्यावरून लातुरसह उस्मानाबाद येथेही प्रवाशांसह नागरिकांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले असून लातूर, उस्मानाबादला या निर्णयाच्या निषेधार्थ बंदही पाळण्यात आला आहे.
 
तापते वातावरण लक्षात घेता रेल्वेच्या सोलापूर येथील प्रबंधकांनी नुकतीच उस्मानाबाद येथील शिष्टमंडळाची भेट घेऊन नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबादकरांनी दि.९ रोजी आयोजित रेल्वे रोको आंदोलन मागेही घेतले होते. परंतु, सोमवारी (दि.८) रेल्वे प्रशासनाने लातूर गाडी बीदरपर्यंत सोडण्याचा निर्णय कायम ठेवत जुलैपासून बीदर-कुर्ला ही रेल्वे दररोज सोडण्याबाबत निर्णय घेतला. परंतु, यामुळे उस्मानाबादकरांची गैरसोय कायम राहणार असल्याने संतापाचे वातावरण आहे. याच परिस्थितीमध्ये रविवारी ज्या कारणामुळे उस्मानाबादकर लातूर-मुंबई ट्रेन बीदरपर्यंत सोडण्यासाठी विरोध करत होते. त्याची पुनरावृत्ती घडली. लातूर येथून ही ट्रेन गच्च भरून आल्याने उस्मानाबादेतून आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही आतमध्ये चढता आले नाही. अनेक प्रवाशांना घरी परतावे लागले. जनरल बोग्यांमध्ये जागाच नसल्याने आतील प्रवाशांनी दरवाजे आतून लावून घेतले. यामुळे येथील प्रवाशांच्या संतापात भर पडली आणि संतप्त प्रवाशाने ट्रेनवर दगड भिरकावले. परंतु, याप्रकरणी कुर्डुवाडी रेल्वे पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. 

अनेक प्रवासी स्थानकावरच राहिले 
प्रथमकोणीच दरवाजातून आत जाऊ देत नसल्याने स्थानकावर तणावाचे वातावरण झाले. यावेळी रेल्वे पोलिसांनी काहींना रेल्वेत चढविले. यासाठी दोनवेळा रेल्वेला थांबविण्यात आल्याचे समजते. परंतु, तरीही अनेक प्रवासी स्थानकावरच राहिल्याने संताप व्यक्त होत होता. त्यातच सदरील रेल्वे बिदरवरूनच येणार असल्याने भविष्यात अशा प्रकारातून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
संताप अनावर होताच फेकले दगड 
उस्मानाबाद स्टेशनवर ट्रेनचे डबे आतून लावून घेण्याची समस्या नवीन नाही. या कारणावरून यापूर्वी अनेकदा वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले आहेत. सध्या रेल्वे पोलिसांच्या मदतीला दररोज स्थानिक पोलिसांनाही रात्री स्थानकावर जावे लागते. रविवारीही असाच प्रकार घडला. दरवाजातून आतमध्ये जाताच येत नसल्याने संतापलेल्या प्रवाशाने दगड फेकले.यामध्ये एक महिला जखमी झाली असून तिला बार्शी येथे उपचारासाठी उतरविल्याचे समजते. 

पोलिसांनी केला बळाचा वापर 
रविवारी रात्री २३.५५ वाजता लातुरहून ट्रेन उस्मानाबादला पोहचली. ट्रेनचे बहुतांश डब्यांचे दरवाजे आतून बंद होते. खिडक्याही बंदच होत्या. काही जागा होत्या. परंतु, आतील प्रवासी दरवाजे उघडत नसल्याने रेल्वे पोलिसांनी बळाचा वापर करून उस्मानाबादच्या प्रवाशांना रेल्वेत बसविण्याचा प्रयत्न केला. यासाठी सुटलेली रेल्वे दोनवेळा थांबविण्यात आल्याचेही कळते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...