आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिदरहून लातूरला खचाखच भरून येतेय मुंबईची रेल्वे, आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही जागा मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गेली आठ वर्षे लातूरमधून थेट मुंबईला जाण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वे उपलब्ध असतानाच ही गाडी बिदरहून सोडण्याच्या निर्णयामुळे लातूरकरांचे हाल होत आहेत. बिदरहून येणारी रेल्वे खचाखच भरून येत असल्यामुळे लातूरच्या प्रवाशांना उभे ठाकण्यासाठीसुद्धा जागा राहिलेली नाही. त्यामुळे या मार्गावर आणखी एक रेल्वे सोडल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.  
 
कुर्डुवाडी ते लातूर या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून लातूरला थेट मुंबईहून रेल्वे सुरू करण्याचे स्वप्न दिवंगत नेते  विलासराव देशमुख यांच्यामुळे साकार झाले. विलासरावांनी रोजगार हमी योजनेतून खडी अंथरण्याची कामे करून दिल्यामुळे केंद्र सरकारला दोन पावले पुढे येऊन रेल्वे रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी लागली. त्यामुळे सन २००८ मध्ये मुंबई-लातूर एक्स्प्रेस सुरू झाली. या गाडीमुळे लातूरच्या प्रवाशांना पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी हक्काची आणि सुखकर गाडी उपलब्ध झाली. ११६ टक्के नफा कमवून देणारी गाडी म्हणून मध्य रेल्वेमध्ये लातूर एक्स्प्रेसची वेगळी ओळख आहे. परंतु या गाडीला खोडे घालण्याचे काम वारंवार रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. यापूर्वी ही गाडी नांदेडपर्यंत सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र, लातूरमधून जाणाऱ्या प्रवाशांनाच जागा आणि तिकीट मिळत नसताना नांदेडपर्यंत विस्तार करण्याने काय साधणार? असे म्हणत लातूरकरांनी लढा उभा केला आणि विस्तार थांबला. त्यातच गेल्या आठवड्यात ही गाडी बिदरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपूर, चाकूर यासह बिदरच्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली असली तरी लातूरकरांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. लातूर, औसा, रेणापूर, परळी, अंबाजोगाई, केज या भागातील लोक मुंबईला जाण्यासाठी लातूर गाडीचाच उपयोग करत असतात.  
 
आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही जागा मिळेना  
बिदरहून निघालेली ही गाडी बिदर, भालकी, उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपूर, चाकूरच्या प्रवाशांना घेऊन लातूरकडे रवाना होत आहे. या गाडीला विस्तारापूर्वी ६ जनरल डबे होते. त्यातील २ डबे कमी करण्यात आले आहेत, तर ६ स्लीपर डबे असताना त्यात २ ची वाढ करण्यात आली आहे. वाढीव डबे बिदरसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जनरल डबे कमी केल्याचा ताण सर्वांवरच पडत असून लातूरला येईपर्यंत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती केवळ जनरलच नव्हे, तर स्लीपरच्या डब्यांमध्येही झाली आहे. आरक्षण असलेल्या प्रवाशांनाही जागा मिळत नाही.
 
पुढील स्लाइडवर वाचा, विश्लेषण - लातूर : रेल्वेसाठीचा संघर्ष ही अभावग्रस्तांची लढाई...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...