आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची घाेडदाैड राेखण्यास विरोधकांची कसोटी, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील २५ जिल्हा परिषद व दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल बुधवारी वाजला. नगरपालिका निवडणुकीत राज्यात नंबर वन ठरल्यामुळे उत्साहित असलेल्या भाजपने या महापालिकांतही ताकद अाजमावण्यासाठी दंड थाेपटले असून मित्रपक्ष शिवसेनाही जाेशात अाहे. दुसरीकडे, काँग्रेस- राष्ट्रवादी मात्र सत्ताधारी युतीसमाेर समर्थ अाव्हान उभे करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसते. मुंबईसह दहा महापालिकांतील राजकीय परिस्थितीचा हा अाढावा...
 
शिवसेना- भाजपमध्येच टक्कर; मनसे गलितगात्र
 
मुंबई: एकत्र लढल्यास युतीचा फायदाच
मुं बई या बालेकिल्ल्यात भाजपसह विराेधकांनी कितीही अाव्हान उभे केले तरी सध्याची परिस्थिती शिवसेनेलाच अनुकूल असल्याचे दिसते.  तसेच युतीने किंवा स्वबळावर लढले तरी भाजपची ताकदही दुपटीहून अधिक वाढू शकते. मुंबई महापालिकेची सत्ता सध्या शिवसेना आणि भाजपच्या ताब्यात असून शिवसेनेचा महापौर, तर भाजपचा उपमहापौर आहे. गेली निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र लढली होती. मनसेचे तेव्हा कडवे आव्हान असल्याने शिवसेनेला भाजपची साथ हवी होती. मात्र, या वेळेस सारी समीकरणे वेगळी आहेत. मनसे जवळपास अस्तित्वहीन होत चाललाय, तर भाजप आज राज्यात ‘माेठा भाऊ’ बनला अाहे.  तरीही मुंबईत मात्र शिवसेनेची जादू कायम असल्याचे दिसते. मुंबई मनपात पुन्हा एकदा शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकताे. स्वबळावर लढले तरी भाजपचे नंबर वनचे स्वप्न पूर्ण हाेण्याची शक्यता धूसर अाहे. युतीने  लढले तर दोन्ही पक्षांची ताकद वाढू शकते. त्याच वेळेस बंडखोरीचीही शक्यता आहे. २०१२मध्ये भाजपचे २२७ सदस्यांपैकी केवळ ३१ सदस्य विजयी झाले होते. काँग्रेसने तेव्हा ५२ जागा जिंकत दुसरा क्रमांक व विरोधी पक्ष नेतेपद पटकावले होते. या वेळेस दुसऱ्या क्रमांकासाठी भाजप व काँग्रेसमध्ये स्पर्धा असून भाजपचे संख्याबळ किमान ६० पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.  
 
उल्हासनगर:  महापौरपदासाठी भाजपचे डावपेच
उल्हासनगराचे महापाैरपद सध्या शिवसेनेकडे अाहे. येथे शिवसेना-भाजप आणि सिंधी समाजाची संघटना साई आघाडीची सत्ता अाहे. गेल्या वेळेस २० जागा जिंकून शिवसेना नंबर वन तर १९ जागा जिंकणारी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हाेती. मात्र नंतर एका पोटनिवडणुकीत कुख्यात गुंड पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी हे राष्ट्रवादीकडून निवडून आल्याने राष्ट्रवादी व भाजपची बरोबरी झाली. मात्र, अाता ओमी कलानी यांनी स्वतंत्र आघाडी उघडून तयारी चालवली आहे. ते भाजपत येण्यास इच्छुक आहेत. तसे झाल्यास भाजप सत्तेवर येऊ शकताे. मुख्यमंत्री कलांनींसाठी अनुकूल असले तरी भाजपचे स्थानिक नेते, सिंधी समाज नेते व माजी आमदार कुमार आयलानी यांचा मात्र विरोध आहे. आजवर कलानींच्या दहशतीविरुद्ध लढलो, आता त्यांच्यासाठीच कसे काम करणार? असा सवाल शिवसेनाही उपस्थित करत अाहे. तसेच भाजपने त्यांना पक्षात घेतल्यास युती करणार नाही, असे शिवसेनेने सुनावले आहे. त्यामुळे सध्या भाजपने केवळ आरपीआयशी युती केली आहे. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसचे दोन नगरसेवक भाजपात गेले. तसेच साई आघाडीचेही सर्व सदस्य भाजपात जाण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसची स्थितीही दखल न घेण्याइतपत होईल. राष्ट्रवादी पक्ष मात्र दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो.
 
साेलापूर: आघाडी- युतीवर ठरेल राजकारण
काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील अाघाडी आणि भाजप व शिवसेना यांच्यातील युतीवर साेलापूर मनपातील राजकीय समीकरणांचे  गणित अवलंबून राहणार आहे.   सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असून मागील पाच वर्षांत महापालिकेचा कारभार पाहता मूलभूत सुविधांसह काही निर्णय वादात अडकले आहेत. त्यामुळे कचरा, पाणीपुरवठ्यासह इतर विषयांवर विराेधक सत्ताधाऱ्यांना काेंडीत पकडतील. भाजप नेते व पालकमंत्री विजय देशमुख,  काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यात खरा कलगीतुरा रंगेल.   केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहरातील कामे करण्यासाठी भाजप महापालिकेचीही सत्ता साेपवण्याचे अावाहन जनतेला करेल. प्रचाराची, तिकीट वाटपाची सूत्रे पालकमंत्री देशमुख यांच्याकडे राहणार आहेत. देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्यात समन्वय राहिला तर भाजप पालिका निवडणुकीत यश मिळवू शकताे.  शिवसेनेत महेश कोठे असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. भाजप व शिवसेना यांच्यात युती होईल का? हे कोडे अद्याप सुटलेले नाही.   
काँग्रेसमध्ये सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांच्यावर पक्षाची धुरा असेल. विद्यमान नगरसेवकांनी तिकिटांची मागणी केलेली नाही. आमदार प्रणिती शिंदे या अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतील.  राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहे त्यासाठी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी एमआयएम, बसपा, माकपा, रासपा यासारखा पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 
 
अमरावती: अाजी-माजी काँग्रेसी नेत्यांतच खरी लढत
अमरावती महापालिकेत पहिली अडीच वर्षे काँग्रेस आणि दुसरी अडीच वर्षे परावर्तित काँग्रेसची सत्ता हाेती. मागील वेळी काँग्रेसचे २५, राष्ट्रवादीचे १७, शिवसेना ९, भाजपचे ८, जनविकास  जनकल्याणचे ७, बसपचे ६  आणि उर्वरित १५ नगरसेवक हाेते.  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या १७ पैकी १० नगरसेवक खोडकेंच्यातंबूत गेले. त्यामुळे  विद्यमान महापौर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या असल्या तरी  सध्या  त्या काँग्रेसकडे अाहेत. मागील निवडणुकीतील काँग्रेसचे २५ नगरसेवक माजी आमदार  रावसाहेब शेखावत यांच्या गटाचे मानले जातात, तर सध्या भाजपचे आमदार असलेले डॉ. सुनील देशमुख यांनी २०१२ च्या निवडणुकीत जनविकास काँग्रेसच्या झेंड्यावर निवडणूक लढविली होती. तेव्हा जनविकासचे सात नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, डॉ. देशमुख सध्या भाजपत आहेत. अाता हाेणाऱ्या निवडणुकीत रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके या दोन्ही काँग्रेसी नेत्यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांना टक्कर देण्याकरिता भारतीय जनता पक्षानेही डॉ. सुनील देशमुख यांच्याकडेच महापालिका निवडणुकीची सूत्रे दिलेली आहेत.  पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे  भाजपने महापालिकेचे निवडणूक प्रभारी पद सोपविले  आहे.  परिणामी, ही निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात दिसत असली तरी खऱ्या अर्थाने ही लढत काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमध्ये रंगणार हे निश्चित.
 
पुढच्या स्लाईड्सवर पाहा, भाजपला ‘अच्छे’ दिन; लढाई सर्वच पक्षांशी... आणि इतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अाढावा.....