आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील पहिल्या नगर पंचायतींचे कारभारी अखेर ठरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचा विजय झाला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचा एक नगरसेवक भाजपकडे गेल्याने भाजपचे संख्याबळ १० वर गेले होते.
सकाळी दहा वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणे सुरू झाल्यानंतर भाजपकडुन वर्षा अंकुश वारे यांनी तर अपक्ष नगरसेवक प्रा.लतिका भानुदास उजगरे यांनी अर्ज दाखल केले. संख्याबळ कमी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाचाही अर्ज दाखल केला नाही. भाजपच्या मंगल मुंडे यांना १० तर राष्ट्रवादीच्या गयाबाई लक्ष्मण आळणे यांना ७ मते मिळाली.उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वर्षा वारे यांना १० तर अपक्ष उमेदवार प्रा.लतिका उजगरे यांना ७ मते पडली. उपनगराध्यक्षपदासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीला उमेदवारही मिळाला नाही.सुरूवातीला सोबत असणारा शिवसेनेचा नगरसेवक शेवटच्या टप्प्यात भाजपकडे गेला. निवडीनंतर भाजपाने आंनद व्यक्त केला.
नवाबखान पठाण नगराध्यक्षपदी
आष्टी -
नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे नवाबखान पठाण आणि उपनगराध्यक्ष पदी शकुंतला सुरवसे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे नवाबखान यांच्या विरोधात भाजपा कडून दादासाहेब गर्जे यांनी तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी च्या शकुंतला सुरवसे यांच्या विरुद्ध भाजपच्या अश्विनी शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने नवाबखान यांची नगराध्यक्ष पदी तर शकुंतला सुरवसे यांची उपनगराध्यक्ष पदी व निवड जाहीर झाली.
देवणी, जळकोट भाजपकडे
लातूर -
जिल्ह्यातील नवनिर्वाचित चारही नगर पंचायतींमध्ये शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी झाल्या. भाजपचे बहुमत असलेल्या देवणी आणि जळकोटमध्ये अपेक्षेप्रमाणे त्या पक्षांचे नगराध्यक्ष झाले. चाकूरमध्ये मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊन राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपद देण्यात आले. शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेस-भाजपला हरवून सत्तेत आलेल्या संभाजीराव पाटलांच्या शहर विकास आघाडीने दोन्ही पदे आपल्याकडेच राखली.
शिरूरमध्ये बिनविरोध
शिरूर अनंतपाळ -
मध्ये १७ पैकी ९ जागा संभाजी पाटील यांच्या आघाडीने मिळवल्या होत्या. अध्यक्षपदासाठी भाग्यश्री देवंग्रे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष शेट्टे यांची बिनविरोध निवड झाली. चाकूरात आघाडीला १७ पैकी ८ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मिलिंद महालिंगे यांचाच एकमेव अर्ज आला होता. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे विलास पाटील, भाजपच्या संतोष माने यांच्यात लढत झाली. विलास पाटील यांना ८ तर संतोष माने यांना ७ मते मिळाली. शिवसेनेचे २ नगरसेवक अनुपस्थित राहिले. जळकोटमध्ये भाजपचे व्यंकट तेलंग अध्यक्षपदासाठी सेना, एमआयएम व एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिला. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे किशनराव दुसट्टे बिनविरोध निवड झाली.
देवणीत भाजप
१७ पैकी भाजपला ७ जागा मिळाल्या. तेथे महाराष्ट्र विकास आघाडीशी भाजपने युती केली. अध्यक्षपदी भाजपच्या विद्यावती मनसुरे मते उपनगराध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या अंजली जिवणे यांची निवड झाली.
पाटोद्यात राष्ट्रवादीचा झेंडा
पाटोदा -
नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा पोटे तर उपनगराध्यक्षदी नय्युम पठाण यांची निवड झाली. शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून मनिषा पोटे, भाजपकडून अनिता गित्ते यांचे अर्ज आले होते. १३ विरुद्ध चार मतांनी पोेटे यांचा विजय झाला. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून नय्युम पठाण, भाजपकडून जयश्री कवठेकर यांनी अर्ज दाखल केले. १३ विरुध्द चार मतांनी नय्यूुम पठाण विजयी झाले.