आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील अस्वस्थता लेखकाला गप्प बसू देत नाही : कोत्तापल्ले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- लेखक उगीच लिहीत नाही तर त्याच्या मनातील अस्वस्थता त्याला गप्प बसू देत नाही. त्याने लिहिले नाही तर काही बिघडणार नाही, पण  लेखकाला ते लिहिल्याशिवाय राहवत नाही. त्या लेखनाचे काय परिणाम होतील याचा विचार न करता तो लिहितो. कधी कधी त्याच्यावर मारेकरीही पाठविले जातात, तर कधी त्याच्या गळ्यात सत्काराचे हारही पडतात. पण या गोष्टींचा  विचार करून तो कधी लिहीत नाही. आज समाजाच्या आरोग्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित होत आहेत. आज जातीय अस्मिता व धार्मिक विद्वेष वाढत आहे. असा काळ  हा लेखकांसाठी प्रचंड अस्वस्थतेचा असतो, असे प्रतिपादन  माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. ते मायबोली मराठी परिषद मुखेड आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते.  

ते म्हणाले, माझ्या लेखनाची सुरुवात ही मुखेडमध्येच झाली. मला त्या काळात चांगले शिक्षक लाभले. मी नववीत असतानाच दीर्घ लेख लिहिला होता. मुखेडला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आज मी पुण्यात राहत असलो तरी  गावाबद्दल माझ्या मनात सतत कृतज्ञता आहे. गावाने  पुढाकार घेऊन मुलांना विचारी बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना नकलांपासून दूर ठेवले पाहिजे.  

या वेळी डॉ. आसाराम लोमटे म्हणाले, माझ्या ‘आलोक’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायबोली मुखेडने जो सन्मान केला त्याचा स्वीकार करतो. हा सन्मान व्यक्तिशः माझा म्हणजे लेखकाचा नसून त्याने आपल्या लेखनात वर्णिलेल्या सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणणारा आहे. कुठलाही लेखक हा केवळ करमणुकीसाठी लिहित नसून लेखनामागे अस्वस्थता व तळमळ असते. समग्र समाजाच्या व्यथांचा विचार त्यामागे असतो. समाजात एक नवा विचार यावा हा हेतू असतो. कोणत्या तरी पिडेनं लेखकाचा पिच्छा केलेला असतो. त्यातून मुक्त होण्यासाठी लेखक लिहित असतो, असेही ते यावेळी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...