आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत आजपासून राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला बुधवारपासून (दि. ११) सुरुवात होणार आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर होणाऱ्या या स्पर्धेचा उदघाटनाचा सामना दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र संघात होणार आहे. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांच्या हस्ते  सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे.  

भारतीय खो-खो महासंघ आणि महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने २७ व्या फेडरेशन चषक पुरुष, महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटनसाठी भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, महासचिव सुरेश वर्मा, स्वागताध्यक्ष अनिल खोचरे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद््घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट पूजा सुर्वे यांच्या पथकाचे रोमहर्षक सादरीकरण होणार आहे. पथसंचलनात पोलिस बँडचा सहभाग राहणार आहे. त्यानंतर ध्वजारोहणाने स्पर्धेस प्रारंभ होईल.    
पुरुष आणि महिला, अशा दोन गटांंत देशातील एकूण १६ संघांची विभागणी करण्यात आली आहे. उद््घाटनानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली पुरुष संघात पहिला सामना, त्यानंतर तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या तुल्यबळ संघांचा सामना क्रीडा रसिकांना पाहावयास मिळणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा, केरळ विरुद्ध हरियाणा, विदर्भ विरुद्ध पश्चिम बंगाल, कर्नाटक विरुद्ध दिल्ली या महिलांच्या संघांमध्ये लढत होणार आहे.
 
देशभरातून १६ संघ दाखल
स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून देशभरातील १६ संघ दाखल झाले आहेत. भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सदस्य आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. १३ तारखेपर्यंत ्रीडा रसिकांना या राष्ट्रीय स्पर्धांची मेजवानी मिळणार आहे. १३ तारखेला सकाळच्या सत्रात उपांत्य सामने होतील. तर सायंकाळी अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर सहभागी संघांना प्रमाणपत्र आणि विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अनिल खोचरे यांनी दिली आहे.