आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय मार्गाचे काम ग्रामस्थांनी अडवले; भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची सोय न केल्याने नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उमरगा  - सोलापूर ते संगारेड्डी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. उमरगा तालुक्यातील   महामार्गालगत असलेल्या सर्वाधिक गावांना भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलांची तसेच सर्व्हिस रस्त्याची व्यवस्था न केल्याने प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. यामुळे वर्षभरापूर्वीच जागोजागी ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते.
मात्र मंगळवारी(दि. ११) रात्री अचानक या गावालगतच्या कामांना सुरुवात करण्यात आली. कोणतीही नोटीस न बजावता काम चालू केल्याने तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांनी जागोजागी कामे अडवली. काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात कामे उरकली जात आहेत.  दाबका या गावात मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन तसेच कंत्राटदार कंपनीला माघार घ्यावी लागली.   
 
उमरगा तालुक्यातील दाबका गावालगत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र दाबका गावातील ग्रामस्थांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नागरी वस्ती असल्याने व गावातील शेतकऱ्यांना पायी व बैलगाडी गावाच्या दुसऱ्या बाजूस  जाण्यासाठी, शाळकरी विद्यार्थी मुलांना, नागरिकांना  येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग करून देण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून लावून धरली होती. याकरिता गावकऱ्यांनी सर्वांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा ग्रामस्थ व महामार्ग व्यवस्थापनाची बैठक एकत्रित बैठक घेतली. मात्र या बैठकीसही महामार्ग अधिकाऱ्यांनी दांडी मारली. मंगळवारी (दि.११) अचानक रात्रीच्या वेळी दाबका गावाजवळील कामास सुरुवात केल्यानंतर गावकऱ्यांनी हे काम थांबवले. संबधित गुत्तेदाराने  पोलिस यंत्रणा मागवली. उपजिल्हाधिकाऱ्यांनाही दखल घ्यावी लागली.  पुन्हा बुधवारी सकाळी कामास सुरुवात  करण्यात आली. मात्र या वेळीदेखील नागरिकांनी  रस्त्यावर बसून अांदोलन केले. तेव्हा प्रशासनास माघार घ्यावी लागली. या वेळी उपजिल्हाधिकारी नीलेश श्रिंगी यांनी  सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग तांत्रिक व्यवस्थापकास बोलावून  गावाचा प्रश्न मिटवण्याची ग्वाही दिली. 
बातम्या आणखी आहेत...