आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिका-यांच्या अनास्थेमुळे वन्यप्राण्यांचे जीवन संकटात, वर्षभरात दोन बिबट्यांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - गेल्या पंधरा दिवसांपासून नियमितपणे दर्शन घडलेल्या बिबट्याचा वसमत तालुक्यातील मरसूळवाडी येथे सोमवारी सकाळी मृतदेह आढळला. तर १० महिन्यांपूर्वी कनेरगाव नाका भागातील कानडखेडा शिवारात सुमारे तीनवर्षीय बिबट्याच्या बछड्याचा समोरील पायाचे पंजे कापून नेलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्राण्यांची ही दशा असताना हरिण, नीलगाईंसारख्या प्राण्यांच्या संरक्षणावरून वन्यजीवप्रेमींमधून तीव्र रोष निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात हरिण, काळवीट, नीलगाई, साळिंदर, रानमांजर, कोल्हे, लांडगे, तरस यांच्यासह राज्यपक्षी हरियल, मोर, रानडुक्कर, सशांसारखे इतर पक्षी-प्राणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. हरिण, नीलगाईंसारखे काही प्राणी शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या, तरी वन विभागाकडून या प्राण्यांना जंगलामध्येच अधिवास मिळावा यासाठी प्रयत्न होत नाहीत. जंगलांमध्ये पाणवठे संख्येने कमी आहेत. जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवरील वनक्षेत्र शेतीखाली आणण्यात आले आहे. त्यामुळे प्राण्यांना मुक्तसंचार करणे मुश्कील झाले आहे. हरिण आणि त्यातही विशेषत: नीलगाईंची शिकार होण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात, परंतु कोणाची तक्रार नसल्याने त्यावर कारवाई होत नाही. कळमनुरी तालुक्यात निलगाईंची कुर्बानी झाल्याच्याही तक्रारी आहेत.
वन विभागाच्या कर्मचा-यांचा वेळ जंगलात कमी आणि शहरातच जास्त दवडत असल्याने प्राण्यांचा आक्रोश त्यांच्या कानावर येत नाही. दोन महिन्यांपूर्वी सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथे दुर्मिळ होत चाललेला साळिंदर प्राणी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याची सुटका करून ग्रामस्थांनी त्याला वन विभागाकडे दिले होते. या प्राण्याची नेमकी संख्या किती आणि त्याची अधिवासाची व्यवस्था काय, हे वन विभाग ठरवू शकला नाही. रानडुकरांची तर बंदुकीने गोळ्या झाडून आजही शिकार केली जाते. शिका-यांना केवळ मांसासाठी शिकार हवी असल्याने याच बंदुका कधी कधी नीलगाई, हरिणांवरही चालतात. डुकराच्या शिकारीवर कठोर निर्बंध नसले तरी बंदुकीचा वापर होणे ही गंभीर बाब असूनही त्याची फारशी दखल वन विभाग घेत नसल्याने अधिकारी, कर्मचा-यांचे वन्यजीवांवरील प्रेम स्पष्ट होते. जिल्हा वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने प्रभार नांदेडच्या वनाधिका-यांकडे आहे. यासंदर्भात नांदेड कार्यालयात संपर्क साधला असता ६ प्रयत्नांनंतर कोणीही फोन उचलला नाही.
स्वतंत्र पथकाची गरज प्राण्यांच्या शिकारी आणि अन्नपाण्यावाचून मृत्यू होणे ही बाब आता जिल्ह्याच्या जंगलात नियमित झाली असल्याने त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. वास्तविकता ही आहे की वन विभागही एखाद्या जखमी प्राण्याच्या पोषणाची जबाबदारी घेत नाही. अन्न व पाणी जंगलातच मिळेल, तसेच एखाद्या संकटग्रस्त प्राण्याबाबत माहिती मिळताच एक पथक ताबडतोब हजर होणेही गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र पथक असल्यास प्रश्न निकाली निघेल.