आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये अभूतपूर्व निर्धार मोर्चा, २० लाखांवर समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - अॅट्राॅसिटी बचाव कृती समितीच्या वतीने नांदेड शहरात रविवारी प्रचंड निर्धार मोर्चा काढण्यात आला. ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी या प्रवर्गातील समाजबांधवांनी अॅट्राॅसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का लावू नये व उच्चवर्णीयांचा त्यात समावेश करू नये, सर्वच बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ कडक शिक्षा करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन मोंढा भागातून या निर्धार मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वतीने दहा मुलींनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर शिवाजी पुतळा परिसरात संविधान प्रस्तावनेचे सामूहिकपणे वाचन करण्यात येऊन राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

या मोर्चात शहर व जिल्हाभरातून सुमारे दहा ते बारा लाख समाजबांधव आल्याचा अंदाज आहे. मात्र, आयोजकांनी मोर्चास २० लाख लोक आल्याचा दावा केला आहे, तर पोलिसांनी मात्र मोर्चास दोन लाख लोक आल्याचा अंदाज वर्तवला आहे. मोर्चात निळे झेंडे घेऊन तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. त्यांच्या साथीला भगवे झेंडेही घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.

प्रमुख मागण्या
अॅट्राॅसिटी अॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात इतर उच्चवर्णीयांचा समावेश करू नये, मुस्लिम समाजास शैक्षणिक, नोकरीत व राजकीय आरक्षण देण्यात यावे, गोवंश हत्याबंदी कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, तंटामुक्त समिती बरखास्त करण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून प्रतिवर्षी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

मोर्चा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही
हा निर्धार मोर्चा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, तर अॅट्राॅसिटी कायद्याच्या
समर्थनार्थ व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असल्याचे मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले. या मोर्चासाठी सुमारे महिनाभरापासून नियोजन करण्यात आले होते. यासाठी वेळोवेळी बैठकाही घेण्यात आल्या होत्या. मोर्चात सहभागी होण्याविषयी गावागावांत व गल्लोगल्ली जाऊन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागरण केले होते.

चोख पोलिस बंदोबस्त
मोर्चाच्या बंदोबस्तासाठी दोन अपर पोलिस अधीक्षक, एक सहायक पोलिस अधीक्षक, १० उपविभागीय पोलिस अधिकारी, २१ पोलिस निरीक्षक, ७७ सहायक पोलिस निरीक्षक, १०१५ पोलिस कर्मचारी, आरसीपी व क्यूआरटी प्लाटून, राज्य राखीव पोलिस दलाची कंपनी असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...