लातूर - राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी ‘शाळासिद्धी मानांकन’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील शाळांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
शाळांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मिळालेले मानांकन ५ वर्षांसाठी वैध राहणार आहे. सात विविध क्षेत्रांतील ४६ गाभामानकांचा अभ्यास करून शाळांचा दर्जा निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांना लॉग इन आयडी व पासवर्ड दिला जाणार असून, शाळांची माहिती संकेतस्थळावर टाकावी लागणार आहे. शाळेचा दर्जा ठरविताना ९९९ गुणांची स्वयंमूल्यांकनावर आधारित चाचणी होणार आहे.
शाळांनी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून द्यायची असून, ज्या शाळांना ९०० पेक्षा जास्त गुण असतील, त्या शाळांची त्रयस्त यंत्रणेकडून फेरतपासणी करून मानांकन दिले जाणार आहे. शाळा शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून शाळा मानके व मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करून राज्य सरकारने हा फाॅर्म्युला आणला आहे. तसेच शाळांना सातत्याने सुधारणेत व्यग्र ठेवण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचण्यात आले आहे.
गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता
सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरीची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शाळांनी त्यांची कामगिरी आणि सुधारणाकेंद्रित गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शालेय सुधारणाकेंद्रित सर्वंकष आणि सर्वांगीण शालेय मूल्यांकन यंत्रणा विकसित करण्यावर अधिक भर दिला जात आहे.
आयएसओ मानांकन रद्द
शाळासिद्धी मानांकन पद्धतीमुळे शाळांचा दर्जा सुधारणार आहे. यापूर्वी शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात होत्या. आता त्या सर्व पद्धती रद्द करून एकच शाळासिद्धी मानांकन पद्धत राज्य सरकारने निश्चित केली आहे. परिणामी आयएसओसारखे मानांकन रद्द करून एकच मानांकन देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातून गुणवत्तेत मागे असलेल्या शाळांना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.