आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडेश्वरीची यात्रा महिनाभरावर येऊनही कोणतेच नियोजन नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरमाळा - महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही प्रसिद्ध असलेल्या व श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे. लाखोंच्या संख्येने येणारे भाविक यामुळे दोन महिने अगोदरच बैठक घेऊन नियोजन केले जाते. परंतु यावर्षी अद्याप एकही बैठक न झाल्याने तसेच स्थानिक पंचायत व मंदिर व्यवस्थापनाकडून प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही कोणीच दखल घेत नसल्याने यात्रेचे नियोजन कसे होणार, याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा राज्यभरात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेचा जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागांवर ताण पडतो. त्यातच यात्रेसाठी दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. गतवर्षीचा यात्रा कालावधीतील भाविकांचा आकडा १० लाखांवर आहे. 

यंदा पाऊसमान चांगले झाल्याने खरिपाबरोबरच रब्बीचाही हंगाम चांगला निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु, अद्याप नियोजनाची बैठकच झालेली नाही. मागील काही वर्षांत यात्रेच्या नियोजनासंदर्भात दोन महिने अगोदरपासूनच बैठका घेऊन वेगवेगळ्या विभागांना जबाबदाऱ्या देऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जात होते. परंतु सध्या यात्रेतील महत्त्वाचा घटक असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे नवीन आलेले असून अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही. यावर्षीची चैत्र पौर्णिमा यात्रा ११ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने तयारीसाठी तातडीने प्रशासनाने हालचाल करण्याची गरज स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...