आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच महिलांच्या पुढाकाराने आष्टीतील गावे पाणंदमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - उघड्यावर शौचास जाऊन होणारी महिलांची कुचंबणा थांबण्यासाठी आष्टी तालुक्यातील तीन गावच्या महिला सरपंचांनी पुढाकार घेऊन गावे पाणंदमुक्त करत स्वच्छतेचा नारा दिला आहे. बोरोडी, करंजी व सुंबेवाडी ही गावे मार्च २०१६ अाधीच पाणंदमुक्त झाली आहेत. तालुक्यातील इतर गावे पाणंदमुक्त करण्यासाठी या महिला सरंपचाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

बीड जिल्ह्यात मार्च २०१६ अखेर १०५ गावे पाणंदमुक्त करण्याचा निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केला असून सध्या गावागावांत स्वच्छतेचे वारे सुरू आहे. गावे पाणंदमुक्त करण्यासाठी महिला सरपंचही पुढे सरसावल्या आहेत. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आष्टी तालुक्याला पाणंदमुक्तीचे महत्त्व कळले आहे. याच तालुक्यातील सुंबेवाडी येथील महिला सरपंच संगीता चंद्रशेखर साके यांच्याकडे गावचा कारभार आल्यांनतर त्यांनी पाणंदमुक्तीची चळवळ सुरू केली. यांच्या घरातच पूर्वीपासून समाजसेवेची आवड असल्याने त्यांना हे काम करणे अगदी सोपे गेले. पती चंद्रशेखर, सासरे, दीर, यांनी सैन्यदलात काम केले असल्याने देशभक्तीबरोबर समाजसेवेचे वातावरण होतेच. संगीता याच्या अगोदर पाच वर्षे गावचे संरपंच म्हणून पती चंद्रशेखर यांनी काम पाहिले. पाच वर्षांपूर्वीच गावात स्वच्छतेचे महत्त्व समजावताना ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन शौचालयाचे बांधकाम करण्याची तयारी दर्शवली ग्रामसेवक जे.डी. शेळके यांनी जनजागृती केल्याने पाणंदमुक्ती करण्यात यश मिळाले तर याच तालुक्यातील करंजी गावच्या सरपंच मनीषा अण्णासाहेब चौधरी यांना गावात पाणंदमुक्तीसाठी श्रीरंग चौधरी, पोलिस पाटील सुधाकर चौधरी, बाळू कदम, दत्तात्रय मुळे, पती अण्णासाहेब चौधरी, उपसरपंच लक्ष्मण आजबे, सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगळे,आष्टी तालुका दूध संघाचे संचालक पोपट आजबे यांची साथ मिळत गेली. ग्रामसेवक एन.एन. कुसुंबे यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त केले. तालुक्यातील तिसरे पाणंदमुक्त गाव बोरोडी हे दोन्ही गावांपेक्षा मोठे येथील सरपंच संध्या जयसिंग गव्हाणे यांचे पती जयसिंग गव्हाणे यांनी काही वर्षांपासून गावात विकासाच्या योजना राबवल्या असल्याने गावात पाणंदमुक्तीची संकल्पना रुजली. गावात २२४ शौचालयांचे बांधकाम करणे फार मोठे आव्हान होते. महिलांनी एकत्रित येऊन शौचालयाचे बांधकाम करणे कसे आवश्यक आहे. हे नागरिकांना पटवून दिले. गावातील उपसरपंच विनायक कावरे, भगवान शेळके, आश्रुबा घालमे, सुभाष रणशिंग, प्रभाकर कराळे, गोविंद भालेकर यांनी त्यांना साथ दिल्याने गाव पाणंदमुक्त झाले. शौचालयाबाबत महिलांनी पुढाकार घेतल्यास जनजागृती लवकर होते असा अनुभव तीनही महिला सरपंचांना आला.
गाव कुटुंबसंख्या
बोरोडी २२४
करंजी १५३
सुंबेवाडी ९७
अनुभव कामी येईल
^यंदाच्या आराखड्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी या गावामधील पाणंदमुक्तीचा अनुभव उपयोगी असून त्यासाठी या तीनही महिला सरपंचांनी मदत करावी, अशी अपेक्षा आहे.
मिलिंद टोणपे, गटविकास अधिकारी, आष्टी
युवकांना मार्गदर्शन
^आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक केले जात आहे. विविध उपक्रमांमुळे पालकमंत्री लोणीकर यांनीही गावाला भेट दिली असून या गावच्या विकासासाठी नियमित पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
प्रा. पुरुषोत्तम वायाळ, मराठवाडा समन्वयक, आर्ट ऑफ लिव्हिंग.