आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी असूनही परळीचे वीज केंद्र महिन्यानंतर सुरू, २ संचांतून ३५० मेगावॅट वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - मुबलक पाणी आणि कोळसा असूनही परळीच्या वीज केंद्राचा मुहूर्त लांबत चालला होता. मंत्र्यांचे दौरे बारगळल्यामुळे तब्बल एक महिना वीजनिर्मिती खोळंबली होती. आताही नगर परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याचे लक्षात घेऊन अखेर अधिकाऱ्यांनीच वीज केंद्र सुरू केले. २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा व सातमधून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मागील दीड वर्षापासून पाण्याअभावी हे केंद्र बंद पडले होते.

पाण्याअभावी परळी येथील वीजनिर्मिती केंद्र जुलै २०१५ मध्ये बंद करण्यात आले होते. यंदा तर ऑगस्ट २०१६ अखेरपर्यंत मराठवाड्यात पाऊस न पडल्याने हे वीज निर्मिती केंद्र सुरू होईल की नाही अशी शंकाच होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने मराठवाड्यातील मोठी धरणे ओसंडून वाहिली. या वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. या केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ७ हा चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला.
संचामधून बुधवारी पहाटेपासून वीजनिर्मिती सुरू झाली होती. तीन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या संच क्रमांक सहामधून बुधवारी दुपारनंतर १०० मॅगावेट वीजनिर्मिती सुरू झाली होती. नवीन दोन्ही संचांतून ५०० पैकी ३५० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. गुरुवारी एकूण क्षमतेएवढी वीज निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

बारा महिने वीज निर्मिती होईल
सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील खडका बंधाऱ्याची एकूण साठवण क्षमता ५ दलघमी असून हा बंधारा १९८० मध्ये बांधला आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर तीन महिने परळीचे केंद्र चालते. हा बंधारा आटल्यास जायकवाडी किंवा माजलगाव धरणातून पाणी सोडले जाते. खडका बंधाऱ्यापासून जायकवाडी धरण १७६ किमी आहे, तर माजलगाव ७० कि.मी. अंतरावर आहे. दोन्ही धरणांतून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची सोय आहे. या वर्षी माजलगाव भरलेले आहे.

दोन लाख टन कोळशाचा साठा
परळी येथे २१० मेगावॅट क्षमतेचे जुने तीन व २५० मेगावॅट क्षमतेचे नवीन दोन संच आहेत. जुने व नवीन वीजनिर्मिती केंद्रात पाच कि.मी.चे अंतर आहे. जुने केंद्र परिसरात एक लाख टन व नवीन वीज निर्मिती केंद्र परिसरात एक लाख टन कोळसा साठवलेला आहे. त्यामुळे २१० मेगावॅट क्षमतेचे जुने संच क्रमांक ४ व ५ कोळसा असेपर्यंत चालविणार आहेत. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन हा छत्तीस वर्षे जुना झाल्याने कायम बंद करण्यात आला आहे.

२४ तासांत सात क्रमांकाचा संच चालेल
^परळी केंद्रात संच क्रमांक सात व सहा चालू करण्यात आले आहेत. सहा नंबरचा संच पूर्ण क्षमतेने चालत असून २४ तासांच्या आत ७ क्रमांकाचा संचदेखील पूर्ण क्षमतेने चालेल. जुन्या संचाच्या बाबतीत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल. -एल. बी. चौधरी, मुख्य अभियंता, परळी वीजनिर्मिती केंद्र, परळी (जि. बीड)
बातम्या आणखी आहेत...