आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीची तीन मुले अकोल्यात सापडली, जायचे होते गणपतीपुळ्याला पोहोचले अकोल्याला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - घरातून पैसे चोरून गुरुवारी दुपारी एक वाजता घराबाहेर पडलेली परळी येथील तीन शाळकरी मुले अकोल्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली आहेत. आम्हाला खरे कोल्हापूरला जायचे होते.  परंतु परळी बसस्थानकावर बोर्ड वाचण्यात चूक झाल्याने पंढरपूर -अकोला या बसमध्ये तिन्ही मुले बसली. पंढरपूर, कोल्हापूर व नंतर गणपतीपुळे येथे जाण्याचा मुलांचा बेत होता. परंतु अकोला येथे गेल्याने  पोलिसांच्या चौकशीत तिघांचा गोंधळ उडाला. आम्ही स्वखुशीने घर सोडून आलो, असे तिघांनी पोलिसांना सांगितले.  

परळी शहरातील पद्मावती गल्लीत राहणारा वरद विनोद कौलवार (१२), गजानन सुंदर आरसुळे (१२), समर्थ भोसले (१४) ही तीन मुले  गुरुवारी दुपारी एक वाजेपासून घरातून बाहेर पडली. सुरुवातीला ती परळी बसस्थानकावर  १.१५ वाजता पोहोचली. त्याच वेळी  त्यांना पंढरपूर -अकोला बस थांबलेली दिसली. तिघेही या बसमध्ये बसल्यानंतर  तिघांनी अकोल्यापर्यंतचे वाहकाकडून तिकीट घेतले. रात्री  नऊ वाजता बस अकोला स्थानकात पोहोचली. बसमधून उतरल्यानंतर स्थानकाच्या बाहेर येऊन बसले. यानंतर बसस्थानकालगत असलेल्या रेल्वेस्थानकावर ते पोहोचले. या ठिकाणी पोलिस दिसताच आम्हाला परळी येथून पळवून आणले असल्याची थाप मारली. हे पाहून तिन्ही मुलांना पोलिसांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिघांची चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आले. सुरुवातीला परळी पोलिसांनी व मुलांच्या नातेवाइकांनी शोधाशोध करूनही मुले सापडत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता अकोला येथील रामदासपेठ पोलिसांनी परळी पोलिस ठाण्यात फोन करत परळी येथील मुले अकोला बसस्थानकाच्या बाहेर सापडल्याची माहिती दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुले सापडल्याने पालकांनी सुटकेचा  नि:श्वास सोडला.  
 
दोघे सहावीत, तर एक आठवतीत : परळीतील  तीन मुलांपैकी  वरद विनोद कौलवार हा  परळी येथील न्यू हायस्कूल शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील किराणा मालाचे व्यापारी आहेत, तर गजानन सुंदर आरसुळे हा ज्ञानबोधिनी शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तो मूळचा पिंपळगाव (गाढे) येथील आहे.
 
घर सोडल्याचे कबूल केले   
- अकोला रेल्वेस्थानकानजीक अपहरण झाल्याची थाप मुलांनी पोलिसांना मारली. परंतु  आम्ही चौकशी केली असता तिघेही आम्ही  कोल्हापूर व गणपतीपुळेला जाण्यासाठी घर सोडल्याची कबुली दिली.   
प्रकाश सावकार, पोलिस निरीक्षक, रामदासपेठ, अकोला.
 
घर सोडण्याची शंका नव्हती  
- माझा मुलगा हा नियमित शाळेत जात असतो. घर सोडून जाईल, अशी शंकादेखील मनाला शिऊ शकली नाही. गल्लीच्या बाहेर न गेलेला मुलगा पळून गेल्याचे दुःख होत आहे.  
श्रद्धा कौलवार, वरदची आई  .
बातम्या आणखी आहेत...