आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतुरकरांचे संयमी दर्शन, सर्वधर्मीयांचा शांततेसाठी पुढाकार, बैठकीत सर्व आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात परतूरच्या घटनेची चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत ही दंगल आणखी चिघळण्याची भीती होती. मात्र झालेला प्रकार विसरून परतूरकरांनी संयम ठेवत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या काही तासांतच जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतही सर्वधर्मीय नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला.  
 
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून  सर्वत्र तणावपूर्ण शांतता होती. दंगाविरोधी पथक, शीघ्र कृती दल आदी तुकड्या दाखल झाल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील शाळा-महाविद्यालये, बँका, विविध कार्यालये बंद होती. प्रशासनाच्या वतीने जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्यामुळे अघोषित संचारबंदी जाणवत होती. दुपारनंतर दोन्ही समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला.  
 शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले.
 
तहसीलमध्ये आयोजित बैठकीला पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार संजय जाधव, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, अन्वर देशमुख, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती होती. किरकोळ भांडणातून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला.  नागरिकांनी त्याला बळी पडू नये, अशी भूमिका याप्रसंगी प्रत्येकाने व्यक्त केली.
 
अपप्रवृत्तीचा डाव ओळखण्याची गरज 
- समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम  समाजकंटक करतात. सामाजिक सलोखा जपत अशा प्रवृत्तीचा डाव वेळीच ओळखून संयमांची भूमिका घेण्याची गरज आहे. शांतता राखण्याचा निश्चय केला आहे. 
 अर्जुन खोतकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री

घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश  
- घटना ही  निंदनीय अाहे. या घटनेनंतर  समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. अफवांवर विश्वास ठेवू नये.
बबनराव लोणीकर, पालकमंत्री, जालना
 
बातम्या आणखी आहेत...