आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी मंत्रालय : नेते हरले, वारसदार जिंकले, सामान्य कार्यकर्त्यांवर मतदारांचा विश्वास (महाकौल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरच्या विजयाचे शिल्पकार संभाजी पाटील निलंगेकर इतर मान्यवरांसह. - Divya Marathi
लातूरच्या विजयाचे शिल्पकार संभाजी पाटील निलंगेकर इतर मान्यवरांसह.
उस्मानाबाद - या वेळी प्रथमच नवखे आणि तरुण चेहरे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यात खासदार-आमदारांच्या मुलांचाही समावेश होता. प्रथमच रिंगणात उतरलेल्या खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या मुलाचा दारुण पराभव झाला, तर आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील, आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण निवडून आले. दुसरीकडे नेत्यांची घराणेशाही काही प्रमाणात मतदारांनी स्वीकारल्याचे चित्र दिसून आले.  
 
नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात उतरणार असल्याचे वृत्त जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच दुसऱ्या दिवशी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्यात नेत्यांच्या मुलांची नावेही दिली होती. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले. त्यानुसार नेत्यांची पिढी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती.
 
त्यात शिवसेनेचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड, आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील, आमदार मधुकर चव्हाण यांचे दुसरे पुत्र बाबूराव चव्हाण, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे पुत्र आदित्य गोरे, 
 
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या स्नुषा अश्विनी जवळगे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे पुत्र दिग्विजय शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी चालुक्य यांचे चिरंजीव तथा राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे मेहुणे अभयराजे चालुक्य आदींचा समावेश होता.
 
 
या निवडणुकीत खासदारपुत्र किरण गायकवाड यांना कुन्हाळी गटातून (ता.उमरगा) काँग्रेसच्या प्रकाश आष्टेंनी काट्याची टक्कर दिली. त्यात किरण गायकवाड पराभूत झाले.
 
आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील यांनी आलूर गटातून बाजी मारली. गुंजोटी (ता.उमरगा) गटातून भाजपचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे पुत्र दिग्विजय शिंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे दत्तू कटकधोंड यांना पराभूत केले. 
 
राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे पुत्र आदित्य गोरे यांचा शिवसेनेचे कैलास पाटील यांनी सांजामधून (ता.उस्मानाबाद) पराभव केला. गोरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे.
 
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील तेरमध्ये विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे सतीश सोमाणी यांचा पराभव केला. एकंदर अपवाद वगळता नेत्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडून आले असून आता जिल्हा परिषदेत तरुण चेहरे सर्वाधिक दिसतील.  

खामकर, दुधगावकर, संगवेंचा पराभव   
बहुतांश ठिकाणी विद्यमान सदस्यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी रिंगणात होते. 
विद्यमान अध्यक्ष अॅड.धीरज पाटील सिंदफळ गटातून दीड हजाराच्या फरकाने निवडून आले. माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्यासह विद्यमान सदस्य बिभीषण खामकर, कांचनमाला संगवे आदींचा पराभव झाला.    
 
संयमी नेतृत्वाचा विजय   
जिल्हा परिषदेत अध्यक्षपदावर असताना अॅड.धीरज पाटील यांनी अनेक चांगली कामे केली. शांत, संयमी स्वभाव असलेल्या अॅड.पाटील यांनी अडीच वर्षे पारदर्शक कारभार केला. त्यांना सिंदफळ गटातून राष्ट्रवादीचे संदीप गंगणे यांनी आव्हान दिले होते. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, ते जवळपास दीड हजार मतांच्या फरकाने निवडून आले.    
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...