आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीच्या विक्रमी आवकीने लातूरचा आडत बाजार फुल्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - तुरीच्या वाढत चाललेल्या आवकीमुळे लातूरचा आडत बाजार फुल्ल झाला आहे. अगदी पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली असून धान्य घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजाराभोवतालच्या रस्त्यावर लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  
 
लातूरची बाजारपेठ नगदी पैसे मिळणारी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, नोटाबंदीपासून हातात रोख पैसे देता येणे शक्य नसल्यामुळे शेतकरी तुरीसह कोणतेच पीक बाजारात आणणार नाहीत, असा बाजार समित्यांचा कयास होता.
 
मात्र, गेल्या वर्षी कर्ज काढून थकलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या पिकावर त्यातील काही परतफेड करणे आवश्यक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतमालाची विक्री करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
 
यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर बाजारात आणली आहे. परिणामी मागणी कमी आणि आवक जास्त अशी परिस्थिती झाल्याने गेल्या वर्षी १३ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या तुरीचे भाव यंदा तिपटीने कमी झाले आहेत. 
 
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असली तरी केंद्र सरकारने तूर निर्यातीवर घातलेली बंदी उठवलेली नाही. त्यामुळे निर्यात नसल्याने स्थानिक बाजारपेठेतच तुरीची विक्री करावी लागत आहे. तूरडाळीला यंदा फार मागणी नसल्याने बाजारपेठेतही उठाव नाही. परिणामी तुरीची खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत आणि झालेच तर त्याला जास्त भावही देण्याची त्यांची तयारी नाही.  
 
दररोज १४ ते १५ हजार क्विंटलची आवक : लातूरच्या बाजारपेठेत जिल्ह्यासह शेजारील कर्नाटकातूनही तूर येते. वास्तविक कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यातील तुरीच्या डाळीला देशभर मागणी आहे. साहजिकच लातूरच्या बाजारपेठेत तुरीला भावही चांगला मिळतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होते.
 
आजघडीला दिवसाला १४ ते १५ हजार क्विंटल आवक होत आहे. सरकारी खरेदी केंद्रांवर फारतर दोन हजार क्विंटलचे माप होऊ शकते. उर्वरित तूर व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय नाही. सरकारी केंद्रावर ५५०० रुपये भाव मिळतो आहे, तर व्यापारी फारतर ४००० रुपये भाव देत आहेत.  
 
गोडाऊन ताब्यात घ्या  
गेल्या आठवड्यात सरकारी गोडाऊन गच्च भरल्यामुळे आणि रिकामी पोती नसल्यामुळे सरकारी केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे ती पुन्हा सुरू झाली. आजही बारदाना उपलब्ध नाही अशी स्थिती आहे. त्याचबरोबर खरेदी केलेली तूर पॅकिंग करून संबंधित गोडाऊनला पाठवण्याची प्रक्रियाही पार पाडावी लागत असल्यामुळे पुन्हा एकदा खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी गोडाऊन ताब्यात घ्यावे, अशी मागणी राजकुमार सस्तापुरे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...