आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या मृत्यू प्रकरणात पोलिस निरीक्षक निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या समशेर खान पठाण याच्या मृत्युप्रकरणी पोलिस निरीक्षक एम.ए.रौफ यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील २५ डिसेंबर रोजी समशेर खानच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. हे प्रकरण सध्या सीआयडीकडे तपासात आहे.

शहरातील समशेर खान पठाण हा श्रीरामपूर पोलिसांकडे दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी त्यास २५ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यात सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस पोलिस अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असून त्यांनीच मारहाण केल्यामुळे समशेर खानचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत जमावाने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दगडफेकीचे प्रकार करीत पोलिसांच्या दोन गाड्या व खासगी वाहनांची तोडफोड केली होती. जमावाने समशेर खानचे पार्थिव नांदेड येथे शवविच्छेदनास नेऊ देण्यासही विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगवला होता. मात्र, याप्रकरणी कठोर चौकशीची मागणी केल्यानंतर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत सुरू केली होती. या चौकशीनंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी रविवारी नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम.ए.रौफ यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश बजावले. 

या प्रकरणात पोलिस जमादार तुळशीदास एकनाथ देशमुख (बक्कल नं.९५०) व हेड कॉन्स्टेबल शेख मुश्ताक शेख माजिद (बक्कल नं.१०८४) या दोघांना पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले आहे.