आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्याने उपटून फेकले टोमॅटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर  - पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून छोट्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली. परंतु माल बाजारपेठेत चार रुपये किलोने विकला जात असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने पीक उपटून बांधावर टाकले.
 
 तेर येथील तरुण शेतकऱ्यांनी वाटवडा (ता. कळंब) येथून अंजू २२५ जातीच्या टोमॅटोची रोपे २० पैसे दराने खरेदी केली. अनिल नारायण कुलकर्णी या शेतकऱ्याने ३० गुंठे लागवडीसाठी सात हजार रोपे आणली. त्यांना शेतात पीक तयार होऊन बाजारपेठेत पोहाेचेपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च आला. 
 
यामध्ये मांडव उभारणी, ठिबकद्वारे पाणी, टोमॅटो तोडणी आदीचा समावेश आहे. परंतु टोमॅटो बाजारात विक्रीसाठी गेल्यानंतर लातूर येथील मार्केटमध्ये २५ किलोच्या कॅरेटला केवळ ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
 
यातून तोडणीचा खर्चही निघाला नाही. ३० गुंठे जमिनीमधून ३५ टन टोमॅटो उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु खर्च परवडत नसल्यामुळे फवारणी व इतर खर्च केला नाही. यामुळे त्यांना २० टन उत्पन्न मिळाले.८०० कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी नेली. परंतु शेतात अजूनही ६०० कॅरेट टोमॅटो उभा आहे. तोडणी, वाहतुकीचा खर्च करून बाजारपेठेत किलोला केवळ ४ रुपये दर मिळत असल्याने वाहतुकीचा खर्चही निघत नाही.
 
पैसा मातीत गेला   
- पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून ३० गुंठे शेतीत हातातील पैसा लावून अंजू २२५ जातीच्या टोमॅटोची लागवड केली होती. शेतात टोमॅटोचे पीक चांगले आले, परंतु लातूर येथील मार्केटमध्ये २५ किलोच्या कॅरेटला केवळ ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. यामुळे शेतातील उर्वरित टोमॅटोचे पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ आली. - अनिल कुलकर्णी, शेतकरी, तेर
बातम्या आणखी आहेत...