आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील ३५० शाळांत व्यावसायिक प्रशिक्षण, केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३५० माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबर २०१५ पासून तर १० वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी लागू करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र शासनाने निर्णय घेतला असून इतर विषयाप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला महत्व राहणार आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीही फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात १ डिसेंबर २०१५ पासून इयत्ता नववीच्या वर्गाला व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अॅटो मोबाईल, हेल्थ केअर, रिटेल(मॉल ट्रेनिंग), सुतार, रंगकाम, फिजिकल फिटनेस ट्रेनिंग, ब्युटी अँड वेलनेस यासह इतर अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणातच व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळाल्यास बेरोजगारी निर्माण होणार नाही. तसेच या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक उच्च शिक्षणासाठी आरक्षण देण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षण विषयाला अभ्यासक्रमातील इतर विषयांप्रमाणेच महत्त्व राहणार आहे. राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने निर्धारित केलेला हा दर्जेदार अभ्यासक्रम असेल. या माध्यमातून नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळणार आहे. इयत्ता नववीपासून शासकीय व खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, सुरुवातीला राज्यातील ३५० शासकीय माध्यमिक शाळांना योजनेचा लाभ मिळणार असून जिल्ह्यातील ५३ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांपैकी १० शाळांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसाहाय्य लाभणार आहे.

पुढील शिक्षणासाठी असे आरक्षण मिळेल
-शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २५ टक्के आरक्षण.
-शासकीय व अशासकीय तंत्रनिकेतनांमध्ये १५ टक्के आरक्षण. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये २५ टक्के आरक्षण.
-द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये २५ टक्के आरक्षण.

व्यावसायिक अभ्यासाचे ६ टक्के मिळणार : इयत्ता दहावीमधील व्यवसाय शिक्षण या विषयाचे गुण ६ टक्के गुणांच्या सरासरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्वितीय अथवा तृतीय भाषेच्या विषयाप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमालाही वेळ देता येईल.

विद्यार्थ्यांना फायदा
-इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना द्वितीय अथवा तृतीय भाषेऐवजी व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ५३ शाळांपैकी १० शाळात १ डिसेंबर २०१५ पासून इयत्ता ९ वीच्या वर्गासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पुढील वर्षापासून इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम लागू होणार आहे. या योजनेचा विद्यार्थांनी लाभ घ्यावा.
औदुंबर उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.