आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकामीच धरणे...वाट पाहे दूरदूर, मराठवाड्यात नुसतीच भुरभुर..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात सूर्यदर्शनच नाही. अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. जालना, हिंगोली, लातूर, परभणीत पाऊस कोसळत असला तरी म्हणावा तसा जोर नसल्याने अद्यापही मोठी धरणे जोत्याखालीच अाहेत. जायकवाडी, माजलगाव, निम्नतेरणासह माजरा धरणातील साठ्यात वाढ झालेली नाही.
नांदेड जिल्ह्यात सरासरी ११.४ मिमी
जिल्ह्याच्या सर्व भागांत दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण असून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १७६.६६ (सरासरी ११.०४) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शहरातही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले आहे. शहरात काल रात्री उशिरा पावसाची रिमझिम सुरू झाली. सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली. पुन्हा दुपारपासून रिमझिम सुरू आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ४८ मि.मी. पावसाची नोंद माहूर येथे करण्यात आली. त्यापाठोपाठ किनवट येथे ३४.४३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात पेरण्यांची कामे बहुतांश ठिकाणी आटोपली असून पिकेही जोमाने डोलू लागली आहेत. त्यामुळे रिमझिम स्वरूपात होणारा पाऊस पिकांना संजीवनी देणारा असल्याने कास्तकार वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे. या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५८.३० मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक पर्जन्यमानाचा हा पाऊस २७.०३ टक्के आहे.
संपूर्ण आठवडाच ठरला पावसाळी
परभणी | शहरासह जिल्ह्यासाठी संपूर्ण आठवडा पावसाळी ठरला. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारीही आठवड्याच्या अखेरीस चांगलीच हजेरी लावली. पावसाचा जोर नसला तरी दिवसभर रिपरिप सुरूच होती.

यंदा जून महिन्यात पावसाचे प्रमाण साधारण राहिले. मात्र, जुलै च्या सुरुवातीपासूनच पावसाने आपली हजेरी नित्याने लावली आहे. मुसळधार स्वरुपाचा पाऊस अधूनमधून झाला असला तरी त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, संततधार भुरभुरीने हा पाऊस जमिनीत पाणी मुरण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पेरण्यांना हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरला असून उगवण चांगली झाली आहे. विशेषत आठवडाभर झालेला पाऊस सर्वदूर व चांगल्या प्रमाणात झाल्याने आतापर्यंत पावसाने १५० मिलिमीटरचा आकडा पार केला आहे. जो अपेक्षित पावसाशी साधर्म्य साधणारा आहे.
लातुरात दिवसभर अधूनमधून रिमझिम
लातूर | लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी दिवसभर अधूनमधून तुरळक स्वरूपात रिमझिम बरसात झाल्याने सूर्यदर्शन झाले नाही. लातूरसह रेणापूर, औसा तालुक्याच्या काही भागात पावसाळी वातावरण होते. परंतु पावसात जोर नव्हता. मध्येच रिमझिम झाल्यानंतर काही काळ उघडीप आणि पुन्हा बारीक पाऊस, असा खेळ सुरू होता. असेच चित्र उदगीर, जळकोट, देवणी आणि चाकूर तालुक्यातही होते. जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस होत असला तरी धुवाधार पर्जन्यवृष्टी होत नसल्याने सर्वच जलस्रोत कोरडेच आहेत. त्यामुळे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न आहे. शनिवारी सकाळपर्यंत सरासरी १८९.८६ मिमी पाऊस झाला.
पुढे वाचा, परभणी-हिंगोलीतील स्थिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...