आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लई दिवसानं..लई नवसानं.. पाऊस आला जोरानं..! पिकांना जीवदान, धबधबा खळखळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ लेणी येथील २९ क्रमांकाच्या लेणीजवळील धबधबा खळाळून वाहिला. परंतु मंगळवारी लेणी बंद असल्याने पर्यटकांना आनंद घेता आला नाही. - Divya Marathi
वेरूळ लेणी येथील २९ क्रमांकाच्या लेणीजवळील धबधबा खळाळून वाहिला. परंतु मंगळवारी लेणी बंद असल्याने पर्यटकांना आनंद घेता आला नाही.
वैजापूर - दुष्काळाची तीव्र कळ सोसणाऱ्या शहर व ग्रामीण भागात सर्वदूर मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या सरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठरल्या. दरम्यान, दमदार पावसामुळे तालुकाभरातील शेतशिवार पाण्याने ओलेचिंब झाले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचे ढग दाटून आले होते. अधूनमधून पावसाची हलकी संततधार सुरू होती. मात्र, सर्वांना अपेक्षित दमदार पावसाच्या सरी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून कोसळण्यास सुरुवात झाली. जवळपास तासभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. खोलगट भागांना पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप आले होते.
गेल्या जून महिन्यात १९ तारखेनंतर पावसाचा खंड पडला होता. काही भागांत तर त्या पावसाच्या सरी न कोसळल्याने पीक पेरणी रखडली होती. मंगळवारी सकाळी हजेरी लावलेल्या पावसाने सर्वदूर भागावर कृपादृष्टी दाखविल्याने खोळंबलेल्या पीक पेरणीला आता वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, तालुक्यातील लहान- मोठे सिंचन प्रकल्पात पावसाच्या पाण्याअभावी जेमतेम पाणीसाठा आहे.

शिऊर येथे ३५ मिमी पाऊस
येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता दमदार पावसाला सुरुवात होऊन तब्बल दोन तास पाऊस झाला. परिसरातील पेंढेफळ, निमगाव, अलापूरवाडी, सफियाबादवाडी व कोल्ही परिसरात दमदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. शिऊर येथील पर्जन्यमापक यंत्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी शिऊर परिसरातील रघुनाथपूरवाडी, हाजीपुरवाडी तसेच हनुमानवस्ती परिसरातील शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

खुलताबाद : नाल्यांना पूर
तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेबारानंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. दोन ते अडीच तास कधी मध्यम तर कधी मुसळधार झालेल्या पावसाने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदी-नाले वाहते झाले असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील फुलमस्ता, गिरजा नद्या वाहत्या झाल्या आहेत. तालुक्यात जलसंधारणाच्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरणामुळे नदी-नाले वाहते झाले .
गंगापूर : ३ तास मुसळधार
गंगापूर । शहर व तालुक्यात मंगळवारी तीन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यातच खोळंबलेल्या खरिपाच्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे. कालपर्यंत तालुक्यात अवघा ३६ मि.मी. इतका कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली होती.
सिल्लोड : जोरदार पाऊस
सतत हुलकावणी देणारा पाऊस यंदा बऱ्यापैकी साथ देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली. १५ जूननंतर सुरू झालेल्या पावसाची आतापर्यंत सरासरी १५७ मिमी नोंद आहे. मागच्या चार वर्षांपासून अत्यल्प व अनियमित पाऊस पडत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, परंतु लवकर येण्याचा अंदाज असलेला पाऊस लांबल्याने चिंता निर्माण झाली होती. बऱ्याच भागात मेच्या अखेरीस धूळपेरणी करण्यात आली होती, तर ठिबकवर कापूस, मिरची लावण्यात आली. त्यातच पाऊस लांबल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. डोंगरपट्ट्यामुळे अंभई मंडळात कायम सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु यंदा आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सिल्लोड मंडळात २६९ मिमी झाला, तर बोरगाव बाजार मंडळात सर्वात कमी ९० मिमी पाऊस झाला.
बातम्या आणखी आहेत...