आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात दमदार पाऊस, एकूण 237.83 मि.मी. पावसाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/ वडवणी - रोहिण्यापाठोपाठ मृगाच्या पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सोमवारी पहाटे शिरूर व परळी तालुका वगळता इतर नऊ तालुक्यांत मान्सूनचा पाऊस बरसला. जिल्ह्यात एकूण 237.83 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस वडवणी तालुक्यात कोसळला आहे. मोरवडमध्ये पावसाच्या तडाख्यात शेकडो कोंबड्या दगावल्या.
मृग नक्षाच्या प्रारंभी 7 जून रोजी पावसाने हजेरी लावल्यानंतर दडी मारली. खरिपाच्या पेरण्या कशा करणार असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला. भरपावसाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. पाऊस वेळेवर न पडल्याने जिल्ह्यात दीडशेहून अधिक टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस न पडल्यास टंचाईस्थिती नियंत्रणाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. रविवारी दिवसभर कधी ढगाळ वातावरण होते. पाटोदा, अंबाजोगाईत रात्री पावसास प्रारंभ झाला तर रात्री उशिरा वडवणी,बीड, अंबाजोगाई, शिरूर, धारूर, केज, पाटोदा, आष्टी, माजलगाव या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.
वडवणीत शेतकरी सुखावला
शेतीची मशागत होऊन पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. तब्बल एक महिन्यानंतर वडवणीत रविवारी रात्री 11 ते पहाटे तीन वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील तलावही अर्ध्यावर आले. सर्व लहान-मोठ्या पुलांवरून पाणी वाहिले. दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. पेरणीयोग्य पाऊस झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.