आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा जोर, उस्मानाबादेत दीड तास दमदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद | आठवडाभरापासून बरसत असलेल्या अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी उस्मानाबादेत जोरदार हजेरी लावली. दीड तास बरसलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दरम्यान, भोगावती नदीलाही पाणी आले होते. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब तालुक्यांना काहीअंशी फायदा झाला होता. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या जोरदार सुरू झाल्या आहेत.

हिंगोलीत जोरदार बरसला
हिंगोली | शनिवारी दुपारी दीड वाजेच्या नंतर जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यांमध्ये सुमारे एक तास रिमझिम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हिंगोली एमआयडीसी, संतुक पिंपरी, बोल्डा, हिंगोली व कळमनुरी शहर, औंढा नागनाथ आदी भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात कमालीची थंडी आल्याने पावसाळासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जालन्यात सर्वदूर हजेरी
जालना | बेमोसमी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शुक्रवारी सायंकाळी विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे रब्बी हंगामात पेरणी केलेल्या गहू,ज्वारी, मका या पिकांसह खरिपातील तुरीच्या पिकाला फायदा होईल, तर मका, सोयाबीन या पिकांची सध्या कापणी सुरू असल्यामुळे या पिकांना त्याचा काही प्रमाणात फटका

लातूर | लातूर शहर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

बीड | केज व शिरूर तालुक्यांच्या काही भागात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील आर्वी, खालापुरी, जांब या भागात तीन तास पाऊस झाला.

पिकांना फायदा
अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील तुरीसह नुकत्याच उगवलेल्या रब्बी ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, करडई आदी पिकांना फायदाच होणार आहे. ही पिके साधारणत: पाऊस व जमिनीतील ओलाव्याच्या भरवशावरच घेतली जातात. त्यातही विशेषत: शेंगा लागण्याच्या अवस्थेतील तुरीसाठी पाऊस जास्त झाल्यास वरदानच ठरणार आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाल्यास पाणी पातळी वाढीसाठी नसला तरी पिकांना मात्र त्याचा फायदाच होणार आहे.

२४ तासांत स्थिती पूर्वपदावर
पश्चिम समुद्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच निर्माण झालेले वादळ आणि त्यानंतरचा पाऊस अनपेक्षितच आहे. आज दुपारनंतर दाबाचे पट्टे पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने येत्या ४८ तासांत आकाशातील ढग निघून जातील आणि थंडी पुन्हा परत येईल. - श्रीनिवास औंधकर, संचालक, सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड स्पेस टेक्नॉलॉजी, एमजीएम, नांदेड.
मक्याची पोती भिजली
लासूर स्टेशन | लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यात शुक्रवार, १४ रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस दुस-या दिवशी शनिवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे लासूर स्टेशन बाजारपेठेतील मक्याची पोती ओली झाली. या पावसाचा काही प्रमाणात रब्बीच्या पिकांना फायदाही होणार आहे.
पैठण तालुक्यात शुक्रवारी रात्री आलेल्या बेमोसमी पावसामुुळे वेचणीस आलेला कापूस हातचा गेल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.