आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटनाः शिरडशहापूर येथे भिंत पडून दोघे जागीच ठार; एक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे गुरुवारी दुपारी २ वाजता पावसापासून बचाव करण्यासाठी पडक्या घराचा आसरा घेण्यासाठी गेलेले तिघे भिंत अंगावर कोसळून त्याखाली गाडले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
शिरडशहापूर येथील शेख जमीर शेख खलील (३०) यांच्या शेतात जुने बांधकाम असलेले दगडांचे घर आहे. दुपारी पाऊस आल्याने शेख जमीर आणि शेजारील शेतातील शेख रफिक शेख खाजा (३६) आणि इस्माईल लाला पठाण (५०) हे त्या पडक्या घरात गेले. मोडकळीस आलेल्या भिंती सोसाट्याच्या वाऱ्यात या तिघांच्या अंगावर कोसळून ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामध्ये शेख रफिक आणि इस्माईल पठाण हे दोघे गुदमरून जागीच मृत्युमुखी पडले, तर शेख जमीर गंभीर असून शिरडशहापूर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत कुरुंदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
नांदेडमध्ये रिमझिम पावसाची अल्पकाळ हजेरी

नांदेड | जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमाराला रिमझिम पावसाने हजेरी लावली; परंतु केवळ पंधरा-वीस मिनिटे भुरभुर येऊन पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ५.४८ मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक १९ मिमी. पाऊस हदगाव येथे, १७.७५ मिमी. माहूर व मुदखेड येथे ११ मिमी. पाऊस झाला. सध्या सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याची एकूण सरासरी २३५.०७ मिमी. झाली आहे. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस २४.६० टक्के झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...