आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या नियुक्तीमुळे राणा समर्थकांत अस्वस्थता, स्थानिक पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राष्ट्रवादी काँग्रेसने चार दिवसांपूर्वी काही मोजक्या जिल्ह्यांतील पक्षाच्या प्रभारीपदाची भाकरी फिरवली. त्यामध्ये उस्मानाबादचे आमदार राणा पाटील यांच्याकडील लातूर जिल्ह्याची जबाबदारी काढून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडे सोपवली आहे. तुलनेने मवाळ चेहरा असलेल्या राणा पाटील यांच्याशी लातूरच्या मंडळींनी चांगलेच जमवून घेतले होते. मात्र, खमक्या धनंजय मुंडेंशी कसे जुळवून घ्यायचे, असा प्रश्न पडल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता आहे.
विलासराव देशमुखांचा प्रभाव असल्यामुळे लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस रुजू शकली नाही. पक्षाची जी काही सत्ताकेंद्रं होती ती पक्षाच्या नव्हे तर त्या-त्या नेत्यांच्या वैयक्तिक वलयामुळे होती. विलासरावांच्या काळात सत्तेची समीकरणे जुळवून घेण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने लातूर जिल्ह्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र विलासरावांचे पद गेल्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीने लातूर जिल्ह्यात संघटन वाढवायला सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने रंगत आणली. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच रंग भरले होते. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून तिकीट मिळालेल्यांना चुचकारत राष्ट्रवादीने ताकद वाढवायचा प्रयत्न केला. शेजारच्या जिल्ह्यातील आमदार या नात्याने राणा पाटील यांच्याकडे लातूरची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

नांदेडचा दौरा झाला. लातूर कधी?
धनंजयमुंडे यांच्यावर नांदेड आणि लातूरच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर मुंडेंनी दोन दिवसांपूर्वीच नांदेडचा दौरा केला. तेथे त्यांनी ज्येष्ठ नेते कदमांपासून अनेकांच्या भेटी, बैठका घेतल्या. ते लवकरच लातूरला येऊन नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी कामाला लागले आहेत.

धनंजय मुंडेच का?
लातूर राष्ट्रवादीची वाटचाल राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. मात्र, खुद्द थोरल्या पवारांनी राणा पाटील यांच्याकडील ही जबाबदारी काढून ती धनंजय मुंडेंवर सोपवण्याची सूचना केल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री आहेत. मात्र त्यांना लातूरला यायला फारसा वेळ मिळत नाही.

पक्षाचे संघटन वाढणार?
लातूरची राष्ट्रवादी म्हणजे एक जेएम, दोन संजय, तीन नगरसेवक यांच्यापुढे सरकत नाही. आपल्याशिवाय इतर कुणीही पक्षात मोठा होणार नाही याची काळजी करण्यातच स्थानिक मंडळी व्यस्त असतात. धनंजय मुंडे यांच्याकडे संघटन कौशल्य असल्यामुळे ते पक्षाचा विस्तार वाढवण्यावर भर देण्याची शक्यता आहे.