आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा नगर परिषदांवर युती; अंबरनाथ, बदलापूर शिवसेनेने राखले, भाेकरमध्ये काँग्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपला संमिश्र यश
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. मोवाड नगर पालिकेत युती सत्तारूढ होणार असली तरी अारक्षणामुळे नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचाच होणार अाहे. तर नव्याने स्थापन झालेल्या वाडी नगर पालिकेत त्रिशंकू चित्र अाहे.
मोवाडमध्ये १७ पैकी भाजपने ९ तर शिवसेनेने २ जागा पटकावल्या. तर राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र, नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव अाहे. या राखीव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार मंगला गजबे व राष्ट्रवादीच्या रंजना साेळंके यांना समान मते पडली. ईश्वर चिठ्ठीत साेळंके विजयी झाल्या. त्यामुळे युतीकडे या पदासाठी उमेदवार नसल्याने साेळंके यांनाच नगराध्यक्षपदाची संधी मिळणार.

२५ जागा असलेल्या वाडी नगर पालिकेत स्वतंत्रपणे लढणा-या भाजपला १० जागा, तर शिवसेनेला केवळ २ जागा मिळाल्या. बसपने अनपेक्षितरीत्या ७ जागा पटकावल्या असून राष्ट्रवादीला ४, काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एका अपक्ष निवडून आला आहे. शिवसेना- भाजप एकत्र अाले तरी बहुमतासाठी त्यांना एक जागा कमी पडणार अाहे. सत्तेच्या चाव्या बसपा आणि अपक्षाकडे आहेत.
राजगुरुनगर अपक्षांचे; सत्ता मात्र भाजपची
पुणे - राजगुरुनगर (ता. खेड) नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांनी नऊ जागा पटकावून वर्चस्व राखले; तर भाजपला सात व शिवसेनेला केवळ दोन जागा जिंकता आल्या. यामुळे अपक्षांच्या मदतीने भाजपला नगर परिषदेची सत्ता मिळवावी लागणार आहे. मतदारांनी बारा युवकांना प्रथमच नगरसेवकपदी निवडून दिले.

या निवडणुकीत १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात होते. भाजपने १६ जागांवर; तर शिवसेनेने १३ उमेदवार उभे केले होते. माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली होती. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे हे ठाण मांडून होते; तर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनीही प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. परंतु, नागरिकांनी व्यक्तिगत संबंधांवर भर देत नऊ मतदारसंघांत अपक्षांना संधी दिली. अपक्ष म्हणून उतरलेले माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी सदस्य या सर्वाना मतदारांनी घरी पाठवले. जुन्या ग्रामपंचायत सदस्यांपैकी फक्त किशोर ओसवाल निवडून आले. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. अर्ध्या तासातच सर्व निकाल जाहीर करण्यात आले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल- भंडार उधळत मिरवणुका काढल्या.
नगर परिषदांचे निकाल खालीलप्रमाणे.
अंबरनाथ (जि. ठाणे) : एकूण जागा - ५७ : शिवसेना- २५, भाजप- १०, काँग्रेस- ८, राष्ट्रवादी ५, मनसे-२ व अपक्ष ७.
बदलापूर (जि. ठाणे) : एकूण जागा - ४७ : शिवसेना- २४, भाजप- २०, राष्ट्रवादी-२, अपक्ष- १.
राजगुरूनगर (जि. पुणे) : एकूण जागा- १८ : भाजप- ७, शिवसेना- २, अपक्ष- ९.
वरणगाव (जि. जळगाव) : एकूण जागा- १८ : भाजप- ८, शिवसेना- १, राष्ट्रवादी- ५, अपक्ष -४.
भाेकर (जि. नांदेड) : एकूण जागा : १९ : काँग्रेस- १२, राष्ट्रवादी- ३ ,भाजप- २, अपक्ष- २.
वाडी (जि. नागपूर) : एकूण जागा : २५ : भाजप - १०, शिवसेना- २, बसप- ७, राष्ट्रवादी- ४, काँग्रेस- १, अपक्ष- १.
माेवाड (जि. नागपूर) : एकूण १७ : भाजप- ९, शिवसेना- २, राष्ट्रवादी- ५, काँग्रेस- १.