आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी काढण्याच्या उपक्रमाला शिक्षकांकडून होतोय विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेताना भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक. - Divya Marathi
विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेताना भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक.
जालना - ‘सेल्फी’ काढावयाची झाल्यास अँड्रॉइड मोबाइल गरजेचा, एकाच सेल्फीत दहा विद्यार्थी न बसणे, ही माहिती पुन्हा सरल अॅपवर ऑनलाइन भरणे या प्रक्रियेत जाणाऱ्या वेळेमुळे शिक्षकांकडून विरोध झाला आहे. या विरोधामुळे महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील २ हजार १०० शाळांत कार्यरत असलेल्या ६ हजार ५०० शिक्षकांपैकी बोटावर मोजण्याइतक्याच शिक्षकांनी सेल्फी काढली. ती सरल अॅपवर अपलोड केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सरलच्या माध्यमातून आजघडीला विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरणे, विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला ऑनलाइन देवाणघेवाण, शिक्षकांची माहिती ऑनलाइन भरणे, शाळेतील सर्व सोयीसुविधा व इतर सर्व माहिती ऑनलाइन भरणे, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थींची माहिती रोजच्या रोज भरणे, इन्स्पायर अवाॅर्ड योजनेची माहिती ऑनलाइन भरणे, स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहिती ऑनलाइन भरणे, शिक्षकांनी प्रशिक्षणाची माहितीसुद्धा ऑनलाइन भरणे, शिक्षकांच्या वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाइन वेतन मागवण्यासह अनेक प्रकारची माहिती ऑनलाइन भरावी लागत आहे.

ही माहिती ऑनलाइन भरण्यासाठी शाळास्तरावर संगणक, विद्युत पुरवठा, तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व कामे बाहेरून करून घ्यावी लागतात. वेगवेगळ्या प्रकारची दररोज माहिती प्रशासनाकडून ऑनलाइन व त्याची लिखित प्रत मागितली जाते. त्यामुळे शाळेतील दोन शिक्षक व्यग्र असतात. तर दोन शिक्षकी शाळेवर एक शिक्षक शाळेत तर दुसरा माहिती गोळा करणे यासह ३६ प्रकारच्या अशैक्षणिक कामातच शिक्षक व्यग्र असतो. त्यातच आता प्रत्येक शाळेमध्ये दर सोमवारी हजेरी घेतानाच सेल्फी दहा विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून हजर, गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन सरलवर भरणे बंधनकारक केले असल्याने ही प्रक्रिया करताना शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे. दरम्यान, सेल्फी उपक्रमामुळे शाळांमध्ये बोगस असलेले विद्यार्थी, हजेरी पटावरील अफरातफर, शिक्षण विभागाला हजेरी पटाची देण्यात येणारी खोटी माहिती तत्काळ  मिळेल.
 
शिक्षकांचा का आहे  विरोध 
प्रत्येक शिक्षकाकडे अँड्राईड मोबाईल नाही, वर्गात ६० विद्यार्थी असेल तर प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १० मिनिटे वेळ गेलातरी साठ विद्यार्थ्यांत १ तासाचा वेळ वाया जात आहे. या प्रक्रीयेसाठी शिक्षण विभागाकडून कुठलीच मदत केली जात नसल्यामुळे शिक्षकांमधून विरोध होत आहे.