आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशी विवाहासाठी जमवलेले वऱ्हाडी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांशी भिडले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलीकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले. - Divya Marathi
चिखलीकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले.
नांदेड- शिवसेनेचे आमदार असतानाही सध्या भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेले प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या घरासमोर “ढोल बजाओ आंदोलन’ करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. हे आंदोलन होणारच याची खात्री असल्याने चिखलीकरही सावध होते. त्यांनी  तुलसी विवाहाच्या निमित्ताने समर्थक वऱ्हाडींना घरी बोलावून जे होईल त्याचा सामना करण्याची तयारी केली. शेवटी सोमवारी हे समर्थक वऱ्हाडी आणि शिवसैनिक आपसांत भिडल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करून गर्दीला पांगवावे लागले.  या घटनेमुळे आनंदनगर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.  पोलिसांनी सुमारे ४५ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, यासंदर्भात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. तसेच शिवसेनेने आपल्यावर कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.  महापालिका निवडणुकीच्या अगोदरपासूनच लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा हातात घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली.   चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेने सोमवारी त्यांच्या वसंतनगर येथील निवसस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवसैनिकांनी आंदोलन केले. मात्र, आंदोलन स्थळी चिखलीकर समर्थक पोहोचल्याने दोन्ही गटांत बाचाबाचीला सुरुवात झाली. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

असा उफाळला संघर्ष
आनंदनगर चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील बाबूराव कदम, धोंडू पाटील, प्रकाश मारावार, प्रवीण जेठेवाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. त्यांनी आमदार चिखलीकरांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली.  शिवसैनिक ढोल वाजवत आ. चिखलीकरांच्या निवासस्थानाकडे जायला निघाले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे तेथेच शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना तेथे आ. चिखलीकर समर्थक आले.  त्यांनीही चिखलीकरांच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केल्याने शिवसैनिक व चिखलीकर समर्थक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. 
 
वऱ्हाडी कार्यकर्ते होते सावधान
 
आमदार चिखलीकर यांनी शिवसेनेचे हे आंदोलन गृहित धरून आपल्या निवासस्थानी तुलसी विवाहाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची जमवाजमव केली होती. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती. शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बॅरिकेटस लावून आमदार चिखलीकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता अडवला होता.
 
 
शिवसेनेने कारवाई करावी
यासंदर्भात आमदार चिखलीकर यांनी राजीनामा देणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच नांदेड येथील शिवसेना ही काँग्रेसचीच शाखा असल्याने आपण भाजपचा प्रचार करत आहोत. शिवसेना नेतृत्वाने आपल्यावर कारवाई करून दाखवावी असेही ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...