उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या वेळीही अपेक्षेनुसार राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना-काँग्रेस-भाजपची आघाडी होण्.याची दाट शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेसह काँग्रेसमधील एक गट काही दिवसांपासून तयारीत आहे. उभय पक्षनेत्यांमध्ये बोलणी सुरू झाली आहेत. मात्र, उमरगा- लोहाऱ्यातील काँग्रेस- शिवसेनेतील तणावपूर्ण संबंधांमुळे या आघाडीची गाडी रुळावर येण्यासाठी काही दिवस जातील.
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणानंतर १० वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झालेल्या माजी आमदार ओमराजे यांच्या राजकारणाचा प्रभाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून दिसला. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि हत्या प्रकरणाच्या सहानुभूतीने त्यांनी काँग्रेस- शिवसेनेला एकत्र अाणत १० वर्षांपूर्वी माजी गृहमंत्री डाॅ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या ताब्यातून जिल्हा परिषद खेचून घेतली. त्यानंतर अाेमराजे शिवसेनेत स्थिरावले; मात्र काँग्रेसला सोबत घेत राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले. १० वर्षांपासून विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढेही विरोधात ठेवण्यासाठी त्यांनी यंत्रणा राबविली आहे. राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचे नसेल तर पुन्हा काँग्रेस- शिवसेनेने एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षातील काही नेत्यांची मनीषा आहे. मात्र, काँग्रेस तसेच शिवसेनेत स्वबळावर लढण्याची अपेक्षा करणाराही निष्ठावान वर्ग आहे. त्यामुळे आघाडीसाठी चढाओढ लागणार आहे. नगरपालिका निवडणुकीत स्वबळ अाजमावलेल्या भाजप नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात असली तरी आघाडीच्या इच्छुक नेत्यांनी भाजपला नेहमीप्रमाणे गृहीत धरलेले दिसत आहे.
गेल्या वेळी सत्तेपासून काही अंतरावर राहिलेल्या राष्ट्रवादीची या वेळी काही नवीन खेळी होते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. नगरपालिका निवडणुकीत तुलनेने जागा वाढल्याने तसेच ग्रामीण भागात मजबूत नेटवर्क असल्याने राष्ट्रवादीचा करिश्मा सर्वपक्षीय नेत्यांना दुर्लक्षित करता येणार नाही. राष्ट्रवादीने यापूर्वीच इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले असून कोणत्या गटातून, गणातून कोणाला उमदेवारी द्यायची, याची तयारी झालेली आहे. मात्र, पालिका निवडणुकीप्रमाणेच ऐनवेळी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
नेत्यांची होणार दमछाक
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच जिल्ह्यातील सर्व प्रस्थापित नेत्यांची मुले, भाऊ, पत्नी, सुना राजकारणात उतरत आहेत. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार बसवराज पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची मुले झेडपीच्या मैदानात असतील. त्यांना निवडून आणण्यासाठी नेत्यांना जिवाचे रान करावे लागेल.
एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष
उस्मानाबाद पालिकेत राष्ट्रवादीला दणका देणाऱ्या ‘ एमआयएम’च्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष अाहे. पक्षाचे ग्रामीण भागात नेटवर्क फारसे नाही. शहरी भागात मतदान मिळविणाऱ्या एमआयएमला ग्रामीण भागात मते मिळवणे कठीण जाणार आहे.