आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिक साहित्य संमेलन: शेतकरी-मजुरांत संघर्ष भासवला जातोय! डॉ.आ.ह.साळुंखे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शेतकरी व शेतमजूर यांच्यात संघर्ष नाहीच.  त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी नाहीत. शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक काही मिळाले तरच त्याला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य होईल. त्यामुळे हा संघर्ष उत्पादनकर्ता शेतकरी आणि उत्पादनाला भाव देणाऱ्या विविध यंत्रणांमध्ये आहे. मात्र त्याला जाणीवपूर्वक शेतकरी व शेतमजूर असा संघर्ष असल्याचे भासवले जात आहे, असे प्रतिपादन पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले.  

जालनातील कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीत रविवारपासून सीटूच्या वतीने या दोन दिवसीय श्रमिक साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ.आ.ह.साळुंखे, कादंबरीकार दीनानाथ मनोहर, महावीर जोंधळे, सिटूचे सचिव डॉ. डी.एल.कराड, शिराळकर, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, संयोजन समितीचे सचिव अण्णा सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.  क्रांती ज्योत प्रज्ज्वलित करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.   

संमेलनाध्यक्ष डॉ.  साळुंखे यांनी  रमिक, श्रम आणि भांडवलशाही व्यवस्था आदी संबंधावर प्रकाश टाकला. आपल्या समाजाला श्रम संस्कृतीचा प्रदीर्घ व प्रभावी वारसा लाभला आहे. ही संस्कृती श्रमाचा गौरव करणारी होती. त्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान जरूर बाळगावा असे डॉ.साळुंखे म्हणाले. बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम यांच्यात तुलना योग्य नाही. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जाऊ शकतात. त्यांना वेगळे करण्याची किंवा त्यापैकी एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ मानण्याची गरज नाही.   

उद्योजकांचीच संपत्ती वाढली
१९९३ नंतर देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात विषमता वाढत चालली आहे. मात्र स्मार्ट सिटी करणाऱ्यांना त्याचे भान राहिले नाही. सरकारची धोरणे उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ होईल, अशीच आहेत.  देशातील शोषित माणून निराश्रित होत आहे. कामगारांचे संरक्षण काढून घेतले जात आहे, ही बाब धोकादायक असल्याचे  डॉ. कोत्तापल्ले म्हणाले. 

जालनेकरांचा प्रतिसाद  
शहरातील शगुन मंगल कार्यालयात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ सन्मान मिरवणुकीने संमेलनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या मिरवणुकीत पुरोगामी साहित्यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जालनेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने भरले होते. त्यामुळे काहींनी सभागृहाच्या बाहेर उभे राहून विचार ऐकले.  

लक्ष ठेवा .. 
घटनेनेे प्रत्येक नागरिकाला आपली जीवनयात्रा चालविण्यासाठी संरक्षण दिले आहे. भारतीय समाजाची उभारणी करण्याच्या दृष्टीने सर्व नियम व कायदे करण्यात आलेले आहेत. मात्र कायद्याने दिलेले हे संरक्षण भांडवलदारांच्या दबावामुळे काढून घेतले जाणार नाही. मात्र याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे, असे डॉ.साळुंखे यांनी या वेळी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...