पैठण - पैठण आगाराची बस अडवून ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत बसवर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यावरील सोलनापूर फाट्यावर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून बसवर दगडफेक व काठ्या मारून काचा फोडणाऱ्या अज्ञात चार जणांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चार अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवर येऊन रात्री १०. ३० च्या सुमारास सोलापूर-पैठण ही पैठण आगाराची बस (एमएच २० बीएल २८४१) सोलनापूर फाट्याजवळ अडवली आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत दगडफेक व काठ्या मारून काचा फोडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बसमध्ये असलेले २० ते २५ महिला व पुरुष प्रवासी चांगलेच घाबरले. मात्र, दगडफेकीत बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत बससमोरील काच आणि प्रवाशांच्या बाजूच्या खिडक्या फुटल्या. हल्लेखोर जाताच बसचे चालक संतोष प्रभू पवार यांनी पैठण पोलिसांशी संपर्क करून बस ठाण्यात आणली. चालक पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चार जणांनी हे कृत्य केले असून लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल. दगडफेक करणारे बहुतेक दारूच्या नशेत असावेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी वर्तवली असून त्यांचा तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
तीस हजार रुपयांचे नुकसान : चार जणांनी बस अडवून केलेल्या दगडफेकीत बससमोरील काच आणि डाव्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.