आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: शासकीय इमारतींत होणार सौरऊर्जेचा लखलखाट, पहिल्या टप्प्यात २६ लाखांची तरतूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- जिल्हातील विविध शासकीय कार्यालयामध्ये आता सौरऊर्जेचा लखलखाट होणार आहे. यासाठी महावितरणने एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमातून जिल्ह्यातील सहा शहरांसाठी पहिल्या टप्प्यात २६ लाख ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे. १५ एप्रिलनंतर सौरऊर्जेची यंत्रणा बसवण्यात सुरुवात होणार आहे. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सौरऊर्जेतून रोज आठ युनिट ऊर्जेची निर्मिती होत आहे.   

वाढत्या कुटुंबसंख्येसोबतच विजेचीही मागणी सातत्याने वाढतच आहे. मागणी अधिक व पुरवठा कमी असल्यामुळे भारनियमनाचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी विजेचा नियमित पुरवठा करण्यासाठीही अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांचा सौरऊर्जेकडे कल वाढवण्यावर भर दिला जात आहे. शासनाकडूनही यासाठी अनुदानाच्या योजना सुरू करण्यात येत आहेत. आता महावितरणच्या माध्यमातूनही सौरऊर्जेचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.   
 
एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम राज्यात सुरू होणार आहे. याच्या माध्यमातून महावितरणकडून यंत्रणेचे अद्ययावतीकरण होणार आहे. यासाेबतच सौरऊर्जेच्या उपक्रमाला चालना देण्यासाठीही यामध्ये वेगळी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी सुरुवातीला यामध्ये २६ लाख ६० हजार रुपयांची तरतूद झाली आहे. 

याच्या माध्यमातून उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर, नळदुर्ग व मुरूम येथील विविध विभागाच्या ३८ शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जेची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. याच्या माध्यमातून कार्यालयातील कामकाजात विजेचा वापर करून सौरऊर्जेपासून निर्मिती झालेल्या विजेचा वापर वाढवण्यात येणार आहे.  जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे उस्मानाबाद शहरात १४ कार्यालयांवर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तुळजापूरला चार, उमरगा, नळदुर्ग, मुरूम येथे प्रत्येकी पाच ठिकाणी कार्यालयांवर यंत्रणा बसवण्यात येणार आहे.     

सौरऊर्जेसाठी जिल्हा अनुकूल
उस्मानाबाद जिल्हा सौरऊर्जेसाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात वर्षातील ३१७ दिवसांत स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. यामुळे येथे सौरऊर्जेला चालना मिळण्यास अडचण येणार नाही. तसेच अपेक्षित प्रमाणात विजेची निर्मिती होणे अपेक्षित आहे.
    
या कार्यालयांना प्राधान्य
काही कार्यालयांकडून वीज बिलाचा भरणा करण्यास अडचणी येतात. यामुळे तेथील वीजपुरवठा  खंडित करण्याची वेळ येते. यामध्ये शासकीय वसतिगृहांचा समावेश आहे. अशा आस्थापनांना सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे वीज खंडित करण्याची नामुष्की होणार नाही.   

आर. पी. कॉलेजचा यशस्वी प्रयोग   
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मुख्य कार्यालय व मुलींच्या वसतिगृहाच्या वर दोन सौरऊर्जेचे युनिट बसवण्यात आले आहेत. यातून रोज आठ युनिट विजेची निर्मिती होती. यामुळे महाविद्यालयाच्या वीज बिलामध्ये मोठी घट आली आहे. तसेच येथे निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरणला विकली जात आहे. येथील यंत्रणेला विन्डव्हीलही बसवण्यात आले आहेत. यामुळे वाऱ्यामुळेही वीज निर्मिती होते. या यंत्रणेचा मोठा फायदा झाला असल्याचे प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांनी सांगितले.   

अतिरिक्त वीज महावितरणला   
शासकीय कार्यालयात बसवलेल्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण घेणार आहे. यासाठीही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामध्ये वेगळी वीज वाहिनी बसवण्यात येईल. निर्माण झालेली अतिरिक्त वीज आपोआप महावितरणच्या यंत्रणेकडे साेपवली जाईल. याचे मोजमाप करण्यासाठी मीटर बसवण्यात येईल.  
 
महावितरणचा पुढाकार
उस्मानाबाद जिल्ह्यात सौरऊर्जेला चालना मिळण्यासाठी महावितरण स्वनिधीतून शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा यंत्रणा उभी केली जाणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमातून यासाठी तरतूद आहे.  
- सी. जे. दिघे, उपविभागीय अभियंता, उस्मानाबाद.   

यंत्रणा व तरतूद (लाखात)   
शहर    तरतूद    यंत्रणा   
उस्मानाबाद    ९.८०      १४   
तुळजापूर    २.८०      ०४   
कळंब    ३.५०      ०५   
उमरगा    ३.५०    ०५   
नळदुर्ग    ३.५०    ०५   
मुरूम    ३.५०      ०५
 
बातम्या आणखी आहेत...