आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमठाणा धरणाचे पाणी वाल्हा प्रकल्पात सोडण्याची चाचपणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर- एक जलप्रकल्प ओसंडून वाहत असल्याने यातून वाहून जाणारे पाणी दुसऱ्या रिकाम्या प्रकल्पात टाकण्याची चाचपणी जालना जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना अर्थात सोमठाणा मध्यम प्रकल्पावर हा प्रयोग राबवण्यासाठी पडताळणी केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी किमान २० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

चार दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सोमठाणा प्रकल्प ओसंडून वाहत आहे. गेल्या १० वर्षांनंतर प्रथमच हा प्रकल्प भरल्याने तालुक्यातील जवळपास ४५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु या प्रकल्पात अद्यापही पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून यातील पाणी वाहून जात आहे. वाहून जाणारे हेच पाणी बदनापूर तालुक्यातीलच वाल्हा धरणात सोडण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याकडे तहसीलदार बालाजी क्षीरसागर आणि जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर यांनी संकल्पना मांडली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तहसीलदार क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून प्राथमिक माहिती घेतली. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जवळचे अंतर ५०० मीटर आहे. त्यासाठी सोमठाणा येथून २० फूट रुंदीचा पाट करण्याचे प्रस्तावित आहे. यात १६ शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
जमिनीसाठी शेतकऱ्यांनी मोबदला मागितल्यास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च चार ते पाच कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. तर दुसरीकडे शेतकरी मोफत जमिनी देण्यास तयार झाले तर अवघ्या २५ ते ३० लाख रुपयांत हा प्रकल्प साकारला जाऊ शकेल. वाल्हा धरणात सध्या १५ टक्के पाणी आहे. या प्रयत्नातून प्रकल्प भरला तर २० गावांची पुढील किमान ५ वर्षे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. तर दुसरीकडे बदनापूर तालुक्यातील ९८ गावांपैकी ६५ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल

लवकरच शेतकऱ्यांची बैठक
सोमठाणा ते वाल्हा या दरम्यान पाट करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची फार जास्त जमीन जाणार नाही. शिवाय या पाटाचा काही प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होईल त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुलभतेने पूर्ण होऊ शकते असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.
पडताळणी करून निर्णय
सोमठाणा प्रकल्पातून पाणी वाल्हा प्रकल्पात सोडण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यासंदर्भात पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
ए.एस.आर.नायक, जिल्हाधिकारी, जालना
माहिती मागवली आहे
^सोमठाणा धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी वाल्हा धरणाला जोडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागवली आहे. कॅनॉलसाठी जमीन आवश्यक असून संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाणार आहे. बालाजी क्षीरसागर, तहसीलदार, बदनापूर
सर्वांनाच फायदा होईल
वाल्हा प्रकल्पात सध्या पुरेसा पाणीसाठा नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० गावांमध्ये टंचाई कायम आहे. सोमठाणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे वाल्हा धरणात अाणल्यास पाणीप्रश्न मार्गी लागेल. कॅनॉलसाठी लागणारी जमीन शासनास उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करू, कारण यातून सर्वांनाच फायदा होईल.
भगवान घाडगे, सरपंच, वाल्हा.
पाणी संकट दूर होईल
दोन्ही धरणे भरल्यास पुढील पाच वर्षे ६५ गावांत पाणीटंचाई भासणार नाही. सोमठाणा ओव्हरफ्लो होऊन सांडव्याचे पाणी वाहूनच जात आहे. हे पाणी वाल्हा धरणात वळवले, तर पाण्याचे संकट दूर होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. प्रशासनाची भूमिका चांगली आहे. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
बाळासाहेब वाकुळणीकर, जि.प.सदस्य, बदनापूर
अप्पर दुधना
या मध्यम प्रकल्पाचे काम १९६४ मध्ये झाले. त्याची क्षमता १२.३७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून ४५ गावांतील शेतीचे सिंचन हाेते. सध्या प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
वाल्हा
या प्रकल्पाचे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. त्याची क्षमता ९.४३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पातून परिसरातील २० गावांना पाणीपुरवठा केला जातो.
या मध्यम प्रकल्पाचे काम १९६४ मध्ये झाले. त्याची क्षमता १२.३७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून ४५ गावांतील शेतीचे सिंचन हाेते. सध्या प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
वाल्हा
या प्रकल्पाचे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. त्याची क्षमता ९.४३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पातून परिसरातील २० गावांना पाणीपुरवठा केला जातो.