आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजातील वाद टाळण्यासाठी आरक्षणाची गरज : संभाजीराजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पैठण - महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केले. आरक्षणामुळे समाज प्रगत झाला. परंतु आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढूनही आरक्षणाचे वाद कोर्टात जात आहेत. गावपातळीवर जे मराठा व इतर समाजांत वाद होतात ते केवळ मराठ्यांना आरक्षण मिळाले नसल्याने होत असून शाहू महाराजांनी जो बहुजनवाद सांगितला, यात मराठा समाज असून हे होणारे वाद टाळण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी पैठण तालुक्यातील कातपूर येथे व्यक्त केले.  

पैठण तालुक्यातील कातपूर येथे राज्यातील पहिल्यांदा उभारण्यात आलेल्या मराठा भवनाच्या कोनशिलेचे उद््घाटन खासदार भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार संदिपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, दत्ता गोर्डे, विनोद पाटील, साईनाथ सोलाट, संतोष गव्हाणे 

आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. खासदार भाेसले पुढे म्हणाले,  मी या ठिकाणी मराठा म्हणून आलो नाही, तर बहुजन म्हणून आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बहुजन एकत्रित केले त्याच धर्तीवर मराठा हादेखील बहुजन असून तो आरक्षणासाठी हक्कदार आहे, मग मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे? संसदेत मराठा आरक्षणावर भाष्य करणारा मी पहिला खासदार आहे. या पुढेदेखील मराठा समाज आरक्षणासाठी पुढे राहणार असल्याचे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.  इतर जाती-धर्माच्या आरक्षणाला हात न लावता तामिळनाडूप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्या, कोपर्डी हे जरी निमित्त असले तरी हा उद्रेक होता तो औरंगाबादच्या पहिल्या मोर्चाने बाहेर आला. त्यानंतर जे मोर्चे झाले त्यांनी इतिहास रचल्याचे ते म्हणाले.  अण्णाभाऊ लबडे, संतोष गोबरे, भाऊ लबडे, किरण जाधव, किशोर तावरेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मराठा नगरसेवकांचा सत्कार संभाजीराजे भाेसलेे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
मोरे यांनी दिली जागा
कातपूर येथील देवीचंद मोरे व त्यांचे पुत्र दीपक मोरे यांनी राज्यातील पहिल्याच मराठा भवनासाठी जागा दिली, अशा दानशूर मराठा समाजातील लोकांनी पुढे येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
 
तारीख लवकरच
तारखेचा जो घोळ सुरू आहे तो मिटवा व तारीख जाहीर करा, असे आवाहन केले.