सिंदखेडराजा - ‘मराठा समाजाने अाता छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारण्याऐवजी पुरेशी जागा घेऊन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारावीत,’ असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी गुरुवारी केले. नाशिक येथील बडव्यांच्या घरांवर छापे टाकल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन करतानाच देशभरातील मंदिरांच्या पुजाऱ्यांवर अशीच कारवाई करण्याचा सल्लाही सरकारला दिला. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘राज्यभरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चांमधील शिस्त, महिलांचा सहभाग यांचेसह इतरही अनेक नावीन्यपूर्ण व ठळक बाबींचा अभ्यास करून त्याचे रेकॉर्ड तयार करायला हवे. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे सर्वच मान्य करतात. परंतु जे लोक अॅट्राॅसिटीचा उपयाेग करतात त्यांनी अापण या कायद्याचा गैरवापर करणार नाही अशी शपथ घ्यावी, तरच म्हणजे समाजमन प्रदूषित होणार नाही’, असे अावाहनही खेडेकर यांनी केले. मराठा समाजाचा अाेबीसीत समावेश करून अारक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. सामाजिक कार्यासाठी भरभरून दान देणे शक्य हाेत नसेल तर निदान कमाईच्या २० टक्के तरी द्या, असे आवाहन त्यांनी केले. संभाजी ब्रिगेड पक्षाच्या स्थापनेला शुभेच्छा देताना, रात्री-अपरात्री एकटी दुकटी मुलगी कधीही कुठेही बिनधास्त हिंडू फिरू शकेल एवढी हमी द्या, अशी अपेक्षा या पक्षाकडून व्यक्त केली.
बहुजन म्हणून आलो : संभाजीराजे
छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, ‘जन्माेत्सवाला अापण खासदार म्हणून नव्हे तर बहुजन म्हणून आलोेत. शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचारांचा डंका अापण संसदेत गाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी पक्ष स्थापनेमागची भूमिका स्पष्ट करताना शाहू, फुले व आंबेडकर या महामानवांच्या विचारांची पुरोगामी भूमिका घेत समाजकारणाला राजकारणाची जोड देणार असल्याचे सांगितले.
श्रीमंत, गरिबांची मुले शासकीय शाळेतच शिकतील, शेतमालाला हमी भाव देऊ व दारूमुक्त गाव हे ब्रीद असल्याचे सांगितले.
मुनाेत यांचा सत्कार
विवाह खर्च टाळून त्या रकमेतून एकशे आठ घरे निर्माण करणाऱ्या औरंगाबाद येथील अजयकुमार मुनोत यांना विशेष मराठा पुरस्कार तर उद्योगपती दत्तात्रय काटे यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.